*💫देवगड दि.२५-:* चालकाचे नियंत्रण सुटून व्हॅगनर गाडी झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये फणसगाव पेंडूरकरवाडी येथील सिध्देश रविंद्र मेस्त्री (३०) हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ५ वा. सुमारास विजयदुर्ग कासार्डे मार्गावर बुरंबावडे एस. टी. स्टॉपनजीक झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, फणसगाव पेंडूरकरवाडी येथील सिध्देश रविंद्र मेस्त्री हा युवक त्याच्या ताब्यातील व्हॅगनर गाडी घेवून तळेरे येथे गेला होता. तळेरे येथून घरी परतत असताना बुरंबावडे एस. टी. स्टॉपनजीक हा अपघात झाला. व्हॅगनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटून गाडी रस्त्याचा उजव्या बाजुला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात सिध्देश मेस्त्री याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात झाल्याची माहिती फणसगाव चेकपोस्ट येथे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. फणसगाव, उंडील तिठा येथील नागरिकांनीही अपघातस्थळी धाव घेतली. या अपघातात व्हॅगनर चालक सिध्देश मेस्त्री याचा जागीच मृत्यू झाला तर गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर मृतदेह फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
चारचाकी झाडावर आदळून युवक जागीच ठार
