छत्रपती शाहु महारांच्या जयंती दिवशी मागासवर्गीयांचे पदोन्नती आदेश निर्गमित करा

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

*💫कणकवली दि.२५-:* छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचे छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या आरक्षणाच्या निर्णया दिवशी आपल्या राज्यात मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबतचे आदेश 26 जुन 2021 रोजी निर्मित करावा आणि पुरोगामी शिव – शाहुंचा वारसा पुढे चालू ठेवावा अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने मागणी करण्यात आली. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या नेतृत्वा खाली पदोन्नतीबाबत महाराष्ट्र शासनाला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले . कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकाऱ्याना निवेदने देण्यात आली . त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हातही कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने निवेदन दिले .छत्रपती राजेश्री शाहू महाराजांनी 26 जून 1902 रोजी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय जनतेला 50 टक्के आरक्षणाची घोषणा केली आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करणे बाबत आदेश जारी केले . सदर आरक्षण शिक्षण नोकऱ्या आणि उद्योगधंद्यांमध्ये देणेबाबत संस्थानातील संबंधितांना सूचना दिल्या . तसेच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता जात निहाय वस्ती ग्रहांची निर्मिती केली. त्या काळातील दलित समाजातील लोकांना नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध करून दिली . शिवाय इयत्ता चौथी पर्यंत शिक्षण असणाऱ्यांना अधिकारीपदाच्या नोकऱ्या आणि वकिलीच्या सनदा दिल्या . देशातील एकूण साडेपाचशे संस्थांपैकी मागासवर्गीयांना 50 टक्के आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज यांचे कोल्हापूर हे एकमेव संस्थान होते . त्यामुळे 26 जून हा त्यांचा जन्मदिवस “आरक्षण दिन “”म्हणून साजरा केला जातो. तरी कास्ट्राईब संघटनेच्या वतीने आपणास नम्र विनंती आहे की, पुरोगामी महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा मागासवर्गीय पदोन्नती उपसमितीचे अध्यक्ष आहात.असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप कदम,कास्ट्राईब शिक्षक संघटना ,महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आकाश तांबे,कास्ट्राईब जिल्हापरिषद संघटना जिल्हाध्यक्ष राजेंद्र कदम,कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र तांबे,कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष किशोर कदम,कास्ट्राईब ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश साळसकर, निलेश कांबळी, सुनिल जाधव, संदेश तांबे, शेषकुमार नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते .

You cannot copy content of this page