रोणापालमध्ये कालवा फुटून शेतकऱ्याचे नुकसान

कर्जबाजारी होण्याची वेळ : भरपाई देण्याची मागणी

*💫बांदा दि.१८-:* दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रोणापाल खुटवळ भागाजवळील कालव्याची भिंत कोसळून शेतकरी योगेश केणी यांनी हजारो रुपये खर्च करून केलेली शेती पाण्यात वाहून गेली. दुधाळ जनावरांसाठी लावण्यात आलेले हत्ती गवत पूर्णपणे नष्ट झाल्याने दुधाळ जनावरांसह आता शेतकऱ्यावर कर्जबाजारी व उपासमारीची वेळ आली आहे. याला सर्वस्वी जबाबदार तिलारी पाटबंधारे कालव्याचे निकृष्ट काम असल्यासचा आरोप, शेतकरी योगेश अशोक केणी यांनी केला. तिलारी कालव्याच्या अधिकाऱ्यांनी जर दोन दिवसांत येऊन प्रत्यक्ष पाहणी करून झालेली नुकसानभरपाई न दिल्यास येत्या सोमवारी गाई म्हैशीना घेऊन तिलारी कालव्याच्या कार्यालयात येणार असल्याचा इशारा योगेश केणी यांनी दिला. दरम्यान निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे म्हणाले की, सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ठेवण्याचे काम नेहमी तिलारी जलसंपदा विभाग करत आहे. योग्य नियोजनाअभावी शेतकऱ्यांच्या भातशेतीमध्ये अक्षरशः माती घुसून मोठे नुकसान होत आहे. निगुडे, रोणापाल, पाडलोस हद्दीत झालेली सर्व कामे निकृष्ट दर्जाची असून याला सर्वस्वी जबाबदार अधिकारीच असल्याचा आरोप गुरुदास गवंडे यांनी केला.

You cannot copy content of this page