आ वैभव नाईक यांचे आवाहन
मालवण (प्रतिनिधी) भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलन न करण्याचे राणेंनी सांगितले होते कारण त्यांना वस्तूस्थिती काय आहे हे माहित आहे. राणेंच्या हॉस्पिटलचा किती लोकांना फायदा झाला हे राणेंनाच माहिती आहे. आता त्यांच्या मागणीनुसार ७५ बेडची सुविधा उपलब्ध होत असून त्याला जिल्हाधिकार्यांनी मान्यता दिली आहे. मात्र या बेडचे कोविड लॅबसारखे होता कामा नये. ४०० बेडची सुविधा आपल्या हॉस्पीटलमध्ये असून जिल्ह्यातील आरोग्याची समस्या सुटणार असा गाजावाजा करणार्या राणेंनी आपल्या हॉस्पीटलमध्ये ५० व्हेंटिलेटरचे बेड मोफत उपलब्ध करून देण्याचे धाडस दाखवावे असा टोला आमदार वैभव नाईक यांनी आज पत्रकारांशी बोलताना लगावला. मालवण दौर्यावर आलेल्या आमदार नाईक यांनी येथील पालिकेच्या नगराध्यक्ष दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत, सन्मेश परब, तपस्वी मयेकर आदी उपस्थित होते. आमदार नाईक म्हणाले, जिल्ह्यात आरोग्य सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरात करण्यात आला आहे. दुसरी लाट येण्यापूर्वी जिल्ह्यात २०० ऑक्सीजनचे बेड होते आज जिल्ह्यात ५०० ऑक्सीजन बेड झाले आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयातही २० ऑक्सीजनचे बेड आहेत. जिल्ह्यात ऑक्सीजनचा प्लांटही तयार केला आहे. महिला हॉस्पीटल कार्यान्वित केले आहे. काही डॉक्टर्सची कमतरता भासत होती. त्यामुळे मुंबई, पुण्यातील कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने मुख्यमंत्र्यांकडे टास्कफोर्स पाठवावी अशी मागणी केली. त्यानुसार ससून हॉस्पीटलचे चार डॉक्टर जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी उपचारही सुरू केले आहेत. आरोग्य विषयक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न पालकमंत्री, खासदार व आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मालवणात २० ऑक्सीजन बेडची सुविधा केली असून आणखी बेडची व्यवस्था करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत मात्र फिजिशियन नसल्यामुळे ते बेड सुरू केलेले नाहीत. फिजिशियनसाठी शासनाकडे विनंती केली आहे. त्यामुळे फिजिशियन उपलब्ध होताच व्हेंटिलेटर बेडची व्यवस्थाही केली जाईल. मधल्या काळात आलेल्या वादळामुळे काही अडचणी आल्या. मात्र यातूनही मार्ग काढत आवश्यक त्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत. गावागावात तसेच पालिका क्षेत्रातही विलगिकरण कक्ष सुरू केले आहेत. जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. येत्या पंधरा दिवसात ही रुग्णसंख्या थांबेल असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्यावतीने करण्यात आलेले आंदोलन हे त्यांचेच अपयश आहे. भाजपने कोविड लॅबला शिवसेना विरोध करत आहे असे सांगितले होते. त्यांच्या आमदार फंडातून जी कोविड लॅब झाली त्याला आम्ही तत्काळ मान्यता दिली. त्या कोविड लॅबचा किती लोकांना फायदा झाला. किती लोकांचे पैसे माफ झाले याचे उत्तर भाजपच्या लोकांनी द्यायला हवे. आता त्यांच्या मागणीनुसार जे ७५ बेड होत आहेत त्याला जिल्हाधिकार्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे शासनाकडून जे जे सहकार्य लागेल ते आम्ही देऊ. मात्र या ७५ बेडचे कोविड लॅबसारखे होता कामा नये. त्यांना मोफत सुविधा द्यायला हव्यात. राणेंच्या हॉस्पीटलमध्ये ४०० बेडची सुविधा आहे त्यामुळे आरोग्यच्या सर्व समस्या सुटणार असा गाजावाजा झाला. मात्र किती लोकांना मोफत सुविधा दिल्या गेल्या. त्यामुळे राणेंनी आपल्या हॉस्पीटलमध्ये ५० व्हेंटिलेटर बेडची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याचे धाडस दाखवावे असेही श्री. नाईक यांनी सांगितले. कट्टा परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तेथील रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी लवकरच कट्टा- पेंडूर उपजिल्हा रुग्णालयात २० ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आमदार नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
