लक्षवेध आंदोलनानंतर वैद्यकीय अधिक्षकाना दिले निवेदन
*💫मालवण दि.१७-:* जिल्हा रेड झोन मध्ये, पालकमंत्री सेफ झोन मध्ये… ठाकरे सरकार हाय हाय… अशा घोषणा देत पालकमंत्री उदय सामंत व महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी पालकमंत्र्यांना जागे करण्यासाठी आज मालवण तालुका भाजपच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालयासमोर लक्षवेध आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील ढासळलेल्या आरोग्य यंत्रणेला जबाबदार कोण ? पालकमंत्री आणि कोण अशी घोषणाबाजी करत भाजप पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांना कोरोना उपचाराबाबतच्या विविध गैरसोयींबाबत जाब विचारला. मालवण तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोरोना महामारीच्या नियंत्रणासाठी पालकमंत्र्यांना जाग आणण्यासाठी जिल्हा भाजपच्यावतीने लक्षवेध अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत आज सकाळी मालवणात तालुका भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयासमोर आंदोलन छेडले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, जि. प. बांधकाम व वित्त सभापती महेंद्र चव्हाण, विलास हडकर,जि. प.सदस्य जेरॉन फर्नांडिस संतोष गावकर, दीपक सुर्वे सरचिटणीस महेश मांजरेकर, नगरसेवक गणेश कुशे, आपा लुडबे, नगरसेविका पूजा करलकर, संतोष कोदे, बबलू राऊत, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, प्रकाश मेस्त्री, यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाली होते. यावेळी आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली. अपूर्ण आरोग्य यंत्रणेला जबाबदार कोण? व्हेंटिलेटर कमी, जबाबदार कोण ? जिल्हा शल्य चिकित्सक नियमित नाहीत , जबाबदार कोण ? जनता विचारते या साऱ्याला जबाबदार कोण ? पालकमंत्री आणि कोण ? अशी घोषणाबाजी करत भाजप पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार व पालकमंत्र्यांचा जाहीर निषेध नोंदवला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांना घेराव घालत भाजप पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील कोरोना उपचाराबाबतच्या अपुऱ्या सोयीबाबत प्रश्नांचा भडिमार करत जाब विचारला. ग्रामीण रुग्णालयानजीक नव्याने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये अपुऱ्या सुविधा आहेत, पुरेसे कर्मचारी, परिचारिका तसेच वॉर्डबॉय नाहीत, २० बेड कोणाला पुरणार असा सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. तालुक्यातील कोरोना संक्रमण हे कोविड सेंटरमुळेच जास्त होत असून रुग्णांच्या सेवेसाठी येणाऱ्या नातेवाईकांमुळे कोरोनाचा प्रसार जास्त होत आहे. यावर प्रशासनाने उपाययोजना काय केल्या ? तालुक्यात ऑक्सिजन बेडची कमतरता असून जास्तीत जास्त ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण करा. मालवण शहराची लोकसंख्या जास्त असताना ग्रामीण भागातच लस पुरवठा जास्त होत असून शहरात कमी प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. लसीकरणाचे योग्य नियोजन करा, खासगी पद्धतीने लस देण्यासाठी उपाययोजना करा, असे यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
