जेष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर यांची मागणी
*💫कणकवली दि.१७-:* कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये सर्विस रोडवर स्पीड ब्रेकर असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अनेक वेळा येथे अपघात होत आहेत.त्यामुळे तातडीने महामार्ग प्राधिकरणने स्पीड ब्रेकर घालावा अशी मागणी जेष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर यांनी केली आहे. स्पीड ब्रेकर अभावी या चौकात अपघाताची दाट शक्यता असल्याने लोकात संताप आहे. संबंधित खात्याने उद्रेकाची वाट पाहू नये असा इशारा कणकवलीतील सुजाण नागरिकांतर्फे दादा कुड़तरकर यांनी दिला आहे. कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक हा जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीचा चौक मानला जातो. या चौकात आचऱ्याहुन येणारा मार्ग कणकवली बाजारपेठेतून येणारा मार्ग तसेच कणकवलीच्या दोन्ही बाजूंनी येणारे सर्व्हिस रस्त्यावरचे ट्राफिक यांची सतत वर्दळ असते. कणकवली पटवर्धन चौकात ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी एकूण चार ठिकाणी स्पीड ब्रेकर अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे. आचरा रोड जिथे सर्विस रोडला मिळतो त्या ठिकाणी तसेच बाजारपेठ मधला रोड ज्या ठिकाणी सर्विस रोडला मिळतो त्या ठिकाणी तसेच दोन्ही बाजूंनी सर्विस रोडवर स्पीड ब्रेकर असण्याची गरज आहे. परंतु याकडे संबंधित खात्याकडून दुर्लक्ष झालेले आहे. कणकवलीमध्ये सर्विस रोडकडे दुर्लक्ष केल्याने चिखलफेक सारखे आंदोलन चिघळले होते. या आंदोलनात बांधकामखाते लक्ष झाले होते. लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता.असे दादा कुडतरकर म्हणाले.
