Headlines

काम सोडून दुसरीकडे जाण्याच्या रागातून तरुणाचा केला खुन…?

मृतदेह सावंतवाडीत आणून टाकला: दोन संशयीतान विरोधात गुन्हा दाखल..

⚡सावंतवाडी ता.०७-: काम सोडून दुसरीकडे जाण्याच्या रागातून एका २३ वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोव्यातील ओल्ड गोवा परिसरात मारहाण केल्यानंतर तरुणाचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे-नमसवाडी येथील आंब्याच्या बागेत आणून टाकण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजीम जुल्फीकार खान (वय २३, सध्या रा. ओल्ड गोवा, मूळ रा. बहराईच, उत्तर प्रदेश) हा गोव्यातील एका शोरमा सेंटरमध्ये काम करत होता. तो काम सोडून दुसरीकडे जाणार असल्याने संशयित आरोपी दीपराज संजय गोवेकर (वय २६, रा. आंबोई-मालार, दिवार, उत्तर गोवा) याच्या मनात राग होता.
६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १.३० वाजण्याच्या सुमारास आरोपीने अजीम राहत असलेल्या एस.एफ.एक्स. बिल्डिंगमधील खोलीत जाऊन त्याला लाकडी दांड्याने तसेच हाताने व लाथांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अजीम चालण्याच्या स्थितीत नसतानाही त्याला कपड्यांची बॅग भरून जबरदस्तीने निळ्या रंगाच्या अल्टो कारमध्ये बसविण्यात आले. आरोपी दीपराज गोवेकर व त्याचा मित्र साहिल यांनी अजीमचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची कोणतीही माहिती न देता तो निरवडे-नमसवाडी येथील आंब्याच्या बागेत आणून टाकल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी अजीमचा मेहुणा मोहम्मद नसीम निजाम अली शेख (वय ३२) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८(अ) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक २७५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ७ ऑक्टोबर रोजी रात्री ९.०८ वाजता पूर्ण झाली. आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू असून, या प्रकरणाचा तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे करीत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पाहणी केली.

You cannot copy content of this page