मालवण (प्रतिनिधी)
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने मालवण धुरीवाडा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण परिसरात मंगळवारी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत कडूलिंबाची चार आणि आवळ्याचे एक अशा एकूण पाच रोपांची लागवड करण्यात आली.
वृक्षारोपण कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर यांच्यासह सदस्य रुजारिओ पिंटो, उमेश शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, शांती पटेल, रूपा कांदळकर, विजयता मेथर आणि बागवे काका उपस्थित होते.
वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून सेवांगण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. लावण्यात आलेल्या रोपांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.
