बांदा, ता. ९ : रक्तदान, प्लेटलेटदान, अवयवदान, देहादान तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्तघटक उपलब्ध करून देणाऱ्या ‘सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान’च्या समाजोपयोगी कार्याचा राज्यस्तरावर गौरव झाला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र आयोजित पुणे येथील राज्य अधिवेशन २०२६ मध्ये प्रतिष्ठानला ‘ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराष्ट्रभरातून ग्राहक प्रतिनिधी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. या वेळी प्रतिष्ठानतर्फे अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या रक्तदाते जोडणी, तातडीने रक्तघटक उपलब्ध करून देणे तसेच रक्तदान, प्लेटलेटदान, अवयवदान आणि देहादान जनजागृतीच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.
प्रतिष्ठानतर्फे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, संस्थापक सदस्य व जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन गुंड तसेच दोडामार्ग–सावंतवाडी विभागीय अध्यक्ष, गोवा समन्वयक आणि ग्राहक पंचायत वेंगुर्ला पदाधिकारी संजय पिळणकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
या सन्मानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तदान चळवळीला राज्यस्तरीय व्यासपीठावर विशेष मान्यता मिळाल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ‘रक्तदान हेच जीवनदान’ या ध्येयातून कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, रक्तदाते, हितचिंतक, सल्लागार, मित्रसंस्था आणि रक्तपेढ्यांचा हा सन्मान असल्याचे प्रकाश तेंडोलकर, सचिन गुंड आणि संजय पिळणकर यांनी सांगितले.
अधिवेशनास न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, माजी मंत्री सुधीर मुनगुंटीवार, आमदार राजेंद्र पवार, सहकार व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, आमदार सुनील शेळके, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. विजय लाड, राज्य सचिव अरुण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव तसेच ग्राहक पंचायत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील आदी उपस्थित होते.
