रुपेश पावसकर आक्रमक:जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी..
⚡कुडाळ ता.०९-: राज्यभर सुरू असलेल्या SRI सर्वेक्षणाच्या कामामुळे ग्रामपंचायतींची नियमित व अत्यावश्यक कामे ठप्प होत असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. SRI सर्वे पूर्ण होईपर्यंत इतर कोणतेही काम करता येणार नसल्याचे काही ग्रामपंचायत कर्मचारी सांगत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
निवेदनात जिल्हाभरातील अनेक गावांमध्ये स्ट्रीटलाईट बंद असल्याने रात्री अंधाराचे वातावरण, महिलांची गैरसोय आणि चोरीची भीती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. तसेच गावातील स्वच्छता, जन्म-मृत्यू दाखले, पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारी आणि इतर दैनंदिन कामांकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गणेशोत्सव आणि गोपाळकाला उत्सव तोंडावर असताना ही परिस्थिती अधिक गंभीर बनू शकते, असेही पावसकर यांनी म्हटले आहे.
SRI सर्वे महत्त्वाचा असला तरी ग्रामपंचायतींची नियमित कामेही तेवढीच महत्त्वाची असल्याचे नमूद करत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व गटविकास अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सकाळी ग्रामपंचायतीची नियमित कामे आणि दुपारी SRI सर्वे अशा रोस्टर पद्धतीची अंमलबजावणी करावी, तसेच स्ट्रीटलाईट, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, कोणत्याही कर्मचाऱ्याने “आम्ही कोणतेही काम करणार नाही” असा नकार देऊ नये, याबाबत लेखी सूचना सर्व ग्रामपंचायतींना देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती रुपेश पावसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
