Headlines

सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांची मुळदे येथील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पास भेट

मत्स्यबीजोत्पादन प्रक्रियेची पाहणी; प्रकल्पाच्या भविष्यातील वाटचालीस सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही

सिंधुदुर्गनगरी, दि. ८ (जिमाका) : सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ येथील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट दिली. यावेळी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे जिल्हा समन्वयक बहर महाकाळ, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गणेश टेमकर, उत्कर्षा किर, तृप्ती जाधव, भक्ती पेजे, सोनल तोडणकर व शीतल कांबळे उपस्थित होते.

प्रकल्प प्रमुख कल्पेश मधुकर शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या मत्स्य संशोधन, प्रशिक्षण व मत्स्य व्यवसाय विकासाच्या कामांची माहिती दिली. केंद्राची सद्यस्थिती, भविष्यातील वाटचाल तसेच विद्यापीठ आणि राज्य शासनाच्या ‘चांदा ते बांदा’ व ‘सिंधुरत्न’ योजनांच्या माध्यमातून प्राप्त निधीचा करण्यात आलेला विनियोग याबाबतही त्यांनी माहिती दिली.

केंद्राच्या वार्षिक मत्स्यबीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत भारतीय प्रमुख कार्प प्रजाती रोहू व कटला यांच्या नर व मादी माशांना त्यांच्या वजनानुसार प्रेरित प्रजननासाठी आवश्यक इंजेक्शनचा डोस देण्याची प्रात्यक्षिक प्रक्रिया यावेळी करण्यात आली. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय तसेच उपस्थित अधिकारी यांनीही या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. या निमित्ताने मत्स्यशास्त्राच्या विद्यार्थीदशेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मत्स्य महाविद्यालयीन विद्यार्थी व मत्स्यशेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मत्स्यसंवर्धनाबाबत माहिती तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेण्याची संधी उपलब्ध होत असल्याने विद्यापीठ व राज्य शासनाच्या निधीचा योग्य व सार्थ विनियोग होत असल्याचे सहाय्यक आयुक्तांनी नमूद केले. मनुष्यबळाची कमतरता असतानाही केंद्रामध्ये मत्स्यसंवर्धनासाठी आवश्यक सुविधा व विविध नाविन्यपूर्ण घटकांचा समावेश करून केंद्राचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरू असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

भविष्यात शासकीय विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या विकासासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी दिली. उपस्थित अधिकाऱ्यांनीही केंद्राला दिलेली भेट सुखद व प्रेरणादायी ठरल्याचे सांगून, भविष्यातील कामकाजासाठी केंद्राला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक विनय सहस्त्रबुद्धे, तांडेल दिपक वाघ, कुशल मासेमार सत्यवान मालोंडकर, कंत्राटी कर्मचारी पंकज गावडे, कार्यालय सहाय्यक समिक्षा अणसुरकर, तसेच संदिप सावंत, सुभाष सावंत, पांडूरंग कासवेकर, प्रज्योत पणदूरकर आणि सर्वेश धुरी यांनी सहकार्य केले.

०००००

You cannot copy content of this page