Headlines

दोडामार्ग केंद्र शाळेला वॉटर प्युरिफायरची भेट…

सौ. वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते वितरण; ९६ विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा..

⚡दोडामार्ग ता.०९-: जिल्हा परिषद केंद्र शाळा, दोडामार्ग नं. १ येथे विद्यार्थ्यांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वॉटर प्युरिफायर वितरण समारंभ उत्साहात पार पडला. सौ. वेदिकाताई विशाल परब यांच्या हस्ते शाळेला वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आला.
या उपक्रमामुळे शाळेतील तब्बल ९६ विद्यार्थ्यांना शुद्ध, सुरक्षित व आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, निरोगी शरीरातून निरोगी विचारांची आणि सक्षम नागरिकत्वाची जडणघडण होते, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बोलताना सौ. वेदिकाताई विशाल परब म्हणाल्या, “आज आपण केवळ एक मशीन देत नाही आहोत, तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया घालत आहोत. ग्रामीण भागात अनेकदा दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी निरोगी राहावा, चांगले शिक्षण घ्यावे आणि भविष्यात आपल्या गावाचे, आई-वडिलांचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, हीच इच्छा आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी उपयुक्त असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न राहील.”
वॉटर प्युरिफायर मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षक व ग्रामस्थांचे समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. एकता एकनाथ नाईक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुमित गोपाळ दळवी, श्री. रंगनाथ गवस, सर्व शिक्षकवर्ग, ग्रामस्थ तसेच सहकारी उपस्थित होते. उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे यावेळी आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page