Headlines

रॅगिंग केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात; वाहन चालविताना वयाचे भान ठेवा…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. देशिंगकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..

⚡ओरोस, ता. ६ -: रॅगिंग हा केवळ विद्यार्थ्यांची चेष्टा-मस्करीचा प्रकार नसून त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. रॅगिंगमुळे विद्यार्थी नैराश्यात जाऊ शकतात, शिक्षण सोडण्याचा विचार करू शकतात, तर काही वेळा त्याचे गंभीर परिणामही होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रॅगिंगपासून दूर राहावे. तसेच १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी वाहन चालवू नये. अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवून अपघात झाल्यास वाहनमालकावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. देशिंगकर यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे एस. एल. देसाई विद्यालय, पाट येथे रॅगिंगविरोधी कायदे तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) या विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी पॅनल विधिज्ञ ॲड. प्रणिता कोटकर यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याची माहिती देताना बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी कायद्याची माहिती पालक, शिक्षक आणि प्रत्येक सजग नागरिकाला असणे आवश्यक असल्याचे सांगितले. पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधून त्यांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शातील फरक समजावून सांगावा, असे आवाहन त्यांनी केले.
घटना घडल्यास घाबरून न जाता तक्रार कशी करावी, तसेच पीडित बालकाची ओळख गुप्त ठेवणे कायद्याने बंधनकारक असल्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. देशिंगकर, पॅनल विधीज्ञ ॲड. प्रणिता कोटकर, शाळेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार साळसकर सर यांनी मानले.

You cannot copy content of this page