Headlines

१५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ‘उद्योजक विचार मंच’ स्थापन करण्याचा प्रस्ताव…

ओरोस ता ६
प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘उद्योजक विचार मंच केंद्र’ स्थापन करून गावातील उद्योगक्षमतेला एकत्रित दिशा देण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत उद्योजक विचार मंचाचा विषय अजेंड्यावर ठेवून त्यावर चर्चा केली जाणार आहे. एका वर्षात किमान एक उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहयोगातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गावातील उपलब्ध संसाधने, कौशल्य, मनुष्यबळ आणि स्थानिक उत्पादन यांचे ‘रिसोर्स मॅपिंग’ करून त्यातून उद्योगाच्या नव्या संधी शोधल्या जाणार आहेत. उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांची आणि उद्योजकांची नोंदणी करून त्यांच्या अडचणींची नोंद ठेवण्यात येईल. मंचाची बैठक पंधरा दिवसांतून एकदा घेऊन या प्रश्नांवर चर्चा करून संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
या उपक्रमासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अभिजित पिसाळ तसेच सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, विशाल कामत, नकुल पार्सेकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, श्रीकृष्ण परब, उद्योजक तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष, ‘गाव तिथे उद्योजक’ महाराष्ट्र राज्यचे प्रमुख रामेश्वर पवार आणि ‘गाव तिथे उद्योजक’ दोडामार्गचे प्रमुख बाबा टोपले उपस्थित होते.
ग्रामपंचायतीत सात सदस्यांची समिती
ग्रामपंचायत पातळीवर उद्योजक विचार मंचाची सात सदस्यांची समिती राहणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवासह सरपंच, ग्रामसेवक, स्थानिक यशस्वी उद्योजक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, डॉक्टर आणि १५ ते २९ वयोगटातील तरुणांचा यात समावेश करण्याचा विचार आहे.
गावातील कोणत्या क्षेत्रात उद्योग उभारता येतील, उपलब्ध संसाधने कोणती आहेत, स्थानिक उत्पादनाची बाजारपेठ कोणती आहे आणि कोणत्या उद्योजकाला कर्ज किंवा शासकीय योजनेची आवश्यकता आहे, याचे ‘रिसोर्स मॅपिंग’ केले जाणार आहे.

तालुका पातळीवर ११ सदस्य
तालुका पातळीवरील मंचासाठी ११ सदस्यांची समिती असेल. गटविकास अधिकारी, लीड बँक व्यवस्थापक, कृषी अधिकारी, पशुधन विकास विभागाचे अधिकारी, यशस्वी उद्योजक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी आणि अन्य तज्ज्ञांचा त्यात समावेश केला जाणार आहे.
गावातील उद्योगांच्या समस्या तालुका समितीपर्यंत पोहोचवून कर्जप्रकरणे, शासकीय योजना आणि कृषी, पशुधन व अन्य व्यवसायांसाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ३० जणांचे ‘कलेक्टिव्ह इंटेलिजन्स’
जिल्हास्तरावर सुमारे ३० सदस्यांचे समन्वय मंडळ तयार केले जाणार आहे. बँका, शासकीय विभाग, उद्योजक, सरपंच आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी यांना एका व्यासपीठावर आणून ‘कलेक्टिव्ह इंटेलिजन्स’ तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्हा उद्योग केंद्रासह विविध विभागांच्या योजनांची माहिती गावापर्यंत पोहोचविणे, उद्योगांना आवश्यक मार्गदर्शन देणे आणि उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासकीय समन्वय साधणे, ही जिल्हा मंचाची प्रमुख भूमिका राहणार आहे.

छोट्या उद्योगांना क्लस्टरची जोड
गावातील छोटे-छोटे उद्योग एकत्र आणून क्लस्टर विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. काजू प्रक्रिया, खाद्यप्रक्रिया, शेतीपूरक व्यवसाय यांसारख्या स्थानिक उद्योगांना एकत्र आणून उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि बाजारपेठेची सामूहिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या क्लस्टर योजनांचा लाभ घेऊन उद्योगांचा विस्तार करण्यासाठी मंचाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
उद्योजकांच्या अडचणींची ग्रामपंचायतीतच नोंद
उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींची नोंदणी करून त्यांच्या अडचणींची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे. पंधरा दिवसांतून एकदा होणाऱ्या बैठकीत या प्रश्नांवर चर्चा केली जाईल. कर्ज, शासकीय योजना, इनक्युबेशन, इनोव्हेशन, बाजारपेठ किंवा तंत्रज्ञानाची गरज असलेल्या उद्योजकांना संबंधित यंत्रणेशी जोडले जाणार आहे.

‘गाव तिथे उद्योजक’ला मिळणार बळ
स्थानिक संसाधने, पारंपरिक व्यवसाय, कृषीपूरक उद्योग, महिला उद्योजकता आणि नवकल्पना यांना एकत्र आणून गावाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरुणांना रोजगारासाठी शहरांकडे जाण्याऐवजी गावातच उद्योग उभारता यावेत, यासाठी आवश्यक वातावरण तयार केले जाणार आहे.

     नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ‘उद्योजक विचार मंच’ स्थापन करण्याचा विषय मांडून ग्रामस्थांशी चर्चा केली जाईल. ग्रामपंचायतीपासून जिल्ह्यापर्यंत शासन, बँका, उद्योजक आणि तज्ज्ञांना जोडून गावातील उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यातून गाव स्वयंपूर्ण, उद्योग सक्षम आणि तरुणांना स्थानिक रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने ठोस पाऊल पडेल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले.
You cannot copy content of this page