Headlines

कणकवलीत महसूल विभागाच्या जागेचे नगरपंचायतीकडे वर्गीकरण करा

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची चंद्रशेखर बावनकुळेंकडे मागणी

कणकवली : शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील जुन्या भाजी मार्केटलगत असलेली महसूल विभागाच्या मालकीची जागा कणकवली नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी कणकवली नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, कणकवली शहराचा सातत्याने विस्तार होत असून नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आप्पासाहेब पटवर्धन चौकाजवळील जुन्या भाजी मार्केटलगत असलेली महसूल विभागाची जागा सध्या वापराविना पडून आहे. ही जागा नगरपंचायतीकडे वर्ग झाल्यास त्या ठिकाणी अत्याधुनिक व्यापारी संकुल, वाहनतळ, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा केंद्र तसेच विविध विकासकामे उभारणे शक्य होईल.

या प्रस्तावामुळे नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, स्थानिक व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासालाही चालना मिळेल. त्यामुळे ही जागा तातडीने कणकवली नगरपंचायतीकडे वर्ग करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी समीर नलावडे यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page