Headlines

सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी…

व्ही. पी. व्ही. युग्का मूर्ती यांचे सहकार्याचे आश्वासन..

⚡बांदा ता.३१-: इंडो-लॅटिन अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे व्हाईस प्रेसिडेंट, अपेडाचे सल्लागार तथा आंतरराष्ट्रीय बँकिंग, फंड वितरण आणि आयात-निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ व्ही. पी. व्ही. युग्का मूर्ती यांनी बांदा येथे सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. कंपनीचे चेअरमन विलास सावंत यांनी त्यांचे स्वागत करून कंपनीच्या भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शनाची विनंती केली.
यावेळी झालेल्या चर्चेत मूर्ती यांनी फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी उपलब्ध असून उत्पादनाचे ब्रँडिंग व निर्यातक्षम नियोजन केल्यास शेतकरी कंपन्यांना मोठा लाभ मिळू शकतो, असे सांगितले. सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीने काजू प्रक्रिया उद्योगात प्रवेश केल्यास जिल्ह्यातील जीआय मानांकन प्राप्त काजूगर देशातील प्रमुख रिटेल साखळ्यांमध्ये तसेच परदेशी बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यास आपण सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास पेट्रोल पंप उभारणीसारख्या योजनांमध्येही मदत करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्गातील जीआय मानांकन प्राप्त काजू, आंबा आणि कोकम या उत्पादनांना जागतिक स्तरावर मोठी मागणी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे सहकार भारती महामंत्री लालाजी पागी, सह्याद्री काजू प्रक्रिया व मद्यार्क उद्योग को-ऑपरेटिव्हचे चेअरमन दाजी उर्फ चंद्रशेखर देसाई, शेतकरी मंगल कामत, ऋतुजा गोरे आदी उपस्थित होते.
चेअरमन विलास सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांची संयुक्त बैठक आयोजित करून मूर्ती यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात येईल, असे यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page