बांदा/प्रतिनिधी
झपाट्याने बदलत असलेला आधुनिक कालखंड हा स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असून, जीवनात भेटलेल्या प्रत्येक गुरूचा सन्मान करायला शिकले पाहिजे. व्यक्तिमत्त्व घडत असताना विविध संस्कारांचा प्रभाव पडत असतो. ते आत्मसात करून जीवन समृद्ध करणे आवश्यक आहे. सतत ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती माणसाला उंचीवर घेऊन जाते, असे प्रतिपादन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वयक प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर यांनी येथे केले.
येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित गुरुपौर्णिमा समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. रश्मी काजरेकर यांनी केले.
प्रा. डॉ. वालावलकर म्हणाले, की गुरु विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, योग्य विचार आणि जीवनाला सक्षम दिशा देणारे संस्कार रुजविणारा असावा. भारतीय संस्कृतीत गुरूला आदराचे स्थान असून, आई-वडिलांबरोबरच गुरूंचाही सन्मान करणे आवश्यक आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. काजरेकर म्हणाले, की भारतीय ज्ञानपरंपरेत गुरू ही संकल्पना ज्ञान आणि अध्यात्माशी जोडलेली आहे. गुरूच्या मार्गदर्शनामुळे विवेकशक्ती जागृत होते, विचारशील आणि संस्कारशील व्यक्तिमत्त्व घडते. गुरु-शिष्य नाते हे श्रद्धा, संस्कार आणि ज्ञानाचा पवित्र सेतू आहे.
यावेळी प्रथम वर्ष कला शाखेचे अमोल देसाई आणि सुहानी जाधव यांनी गुरूप्रतीच्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण प्रसारक मंडळ, बांदाचे माजी संचालक कै. शरदचंद्र महाबळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. अनिल शिर्के यांनी मानले. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. काजरेकर यांच्या हस्ते सर्व गुरूंचा सन्मान करण्यात आला.
फोटो:-
बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. डॉ. एमएन वालावलकर. सोबत इतर.
काळाचे भान राखत जीवनात लाभलेल्या गुरूंचा सन्मान करा : प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर
