Headlines

“गड्या, तू एकटा नाहीस… आम्ही सारे तुझ्या सोबत आहोत !”

शेतकऱ्यांना न्याय नसेल तर जलसमाधीचाच निर्धार ; ३ जुलैच्या देवगड आंदोलनासाठी राजू शेट्टींचे भावनिक आवाहन

देवगड | प्रतिनिधी

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाकडे राज्य व केंद्र सरकारने केलेल्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रतिकलम अवघी २२० रुपयांची नुकसानभरपाई देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करत, “सरकार न्याय देणार नसेल तर जलसमाधी घेऊनच आम्ही आमचा शेवट करू,” अशी संतप्त भूमिका त्यांनी मांडली. याच पार्श्वभूमीवर ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता देवगड येथे होणाऱ्या जलसमाधी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले.

शेट्टी म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी नैसर्गिक संकटामुळे उद्ध्वस्त झाला आहे. वातावरणातील बदलांमुळे आंब्याला फळधारणा झाली नाही, तर काजूचेही मोठे नुकसान झाले. ही नैसर्गिक आपत्ती मानून राज्य व केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन निधीतून भरीव मदत करणे अपेक्षित होते. त्याचबरोबर विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यायला हवी होती. मात्र शासन आणि विमा कंपन्या दोघांनीही शेतकऱ्यांची घोर निराशा केली.
“प्रतिकलम २२० रुपयांची नुकसानभरपाई म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. मोर्चे काढले, रास्ता रोको केले, मेळावे घेतले; तरीही हे मूर्दाड सरकार शेतकऱ्यांच्या वेदनांकडे पाहायलाही तयार नाही,” असा आरोप त्यांनी केला.
देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. “कोकणचे पर्यावरण आधीच असंतुलित झाले आहे. त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. अशा परिस्थितीत अणुऊर्जा प्रकल्प उभारला गेला, तर कोकणातील आंबा, काजू आणि कोकम या बागायती कायमच्या संपुष्टात येतील. भातशेती आधीच संपत आली आहे. उरलेली बागायतीही नष्ट झाली, तर संपूर्ण कोकण उद्ध्वस्त होईल. कोकणचा कॅलिफोर्निया करण्याऐवजी सरकार कोकणचे राजस्थान करण्याच्या मार्गावर आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

“ज्याचे कोकणवर नितांत प्रेम आहे, मग तो कोकणात राहत असो किंवा मुंबईत, त्याने ३ जुलै रोजी देवगड येथे उपस्थित राहावे. कोकणची हिरवाई, शेती आणि पर्यावरण वाचविण्यासाठी हा निर्णायक लढा आहे. ‘गड्या, तू एकटा नाहीस… आम्ही सारे तुझ्या सोबत आहोत!’ हा विश्वास प्रत्येक शेतकऱ्याला देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा,” असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

You cannot copy content of this page