Headlines

पल्स पोलिओ मोहिमेचा भाजप महिला आघाडीकडून आढावा

एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये; सौ अन्वेषा आचरेकर यांचे आवाहन

मालवण,दि प्रतिनिधी

देशभरात राबविण्यात येत असलेल्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा भाजप मालवण शहराध्यक्षा सौ अन्वेषा आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
विविध पोलिओ लसीकरण केंद्रांना भेटी देत मोहिमेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. आज मालवण ग्रामीण रुग्णालय येथील पल्स पोलिओ लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे वैद्यकीय अधिकारी डॉ बालाजी पाटील हेही उपस्थित होते

यावेळी भाजप महिला आघाडीच्या तालुका सरचिटणीस महिमा मयेकर, अमृता फाटक, नगरसेविका महानंदा खानोलकर तसेच तारका चव्हाण उपस्थित होत्या.

भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी विविध केंद्रांवर जाऊन सुरू असलेल्या लसीकरण प्रक्रियेची पाहणी केली. आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सकाळपासून किती बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्यात आले, याची माहिती घेतली. तसेच मोहिमेच्या अंमलबजावणीत कोणत्याही अडचणी येत आहेत का, याचीही सविस्तर विचारपूस करण्यात आली.

यावेळी बोलताना भाजप शहराध्यक्षा अन्वेषा आचरेकर यांनी “भारताचे पोलिओमुक्त स्थान कायम राखण्यासाठी पल्स पोलिओ मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक या जीवनरक्षक डोसपासून वंचित राहू नये, यासाठी आमची संपूर्ण टीम कार्यरत आहे. सुट्टीच्या दिवशीही निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि अंगणवाडी सेविकांचे योगदान खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगून काही कारणास्तव आपल्या पाल्याला आज केंद्रावर आणता आले नसेल, तर पुढील दोन-तीन दिवसांत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटीदरम्यान मुलांना पोलिओचा डोस अवश्य द्यावा, असे आवाहन केले .
भाजप महिला आघाडीच्या तालुका सरचिटणीस महिमा मयेकर यांनी पल्स पोलिओ मोहिमेला मालवण शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रत्येक बालकापर्यंत पोलिओचा डोस पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवक समन्वयाने कार्यरत असल्याचे सांगितले

You cannot copy content of this page