अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या पाच होड्या आढळल्या:तीन होड्या नदीपात्रात बुडविल्या..

⚡कुडाळ ता.०८-: कुटगाव येथील नेरूरपार जेटी परिसरात अनधिकृत वाळू उपसा व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी कारवाई केली. या कारवाईत वाळूने भरलेल्या एकूण पाच होड्या आढळून आल्या. त्यापैकी तीन होड्या नदीपात्रात बुडविण्यात आल्या, तर दोन होड्या प्रवाहाबरोबर सोडून देण्यात आल्या.
उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागाच्या पथकाने नेरूरपार जेटी परिसरात पाहणी केली असता नदीपात्रात अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणाऱ्या होड्या आढळून आल्या.
या कारवाईत कुडाळ व पिंगुळीचे मंडळ अधिकारी, कुटगाव, नेरूर, चेंदवण व वालावल येथील ग्राम महसूल अधिकारी तसेच संबंधित पोलिस पाटील सहभागी झाले होते.
अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून नियमितपणे तपासणी व कारवाई केली जात आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून वाळू उत्खनन अथवा वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महसूल विभागाने दिला आहे.
