डी.वाय.एस.पी. शेलार यांचे युवकांना आवाहन…

⚡मालवण ता.०८-:
आजची युवा पिढी ही देशाचे भवितव्य असून युवकांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांनी केलेल्या कष्टांची जाणीव ठेवावी. व्यसनांच्या आहारी गेल्याने केवळ एका व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आणि पर्यायाने समाज व देशाचे नुकसान होते. त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहून चांगल्या मित्रांची संगत ठेवावी, असे आवाहन डी.वाय.एस.पी. दीपक शेलार यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए सो कनिष्ठ महाविद्यालय आणि मालवण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘जनजागृती अभियान’ पार पडले. यावेळी व्यासपीठावर मुख्य वक्ते म्हणून मालवण पोलीस स्टेशनचे डी.वाय.एस.पी. श्री. दिपक शेलार, प्राचार्य आर डी बनसोडे, प्रा पवन बांदेकर, प्रा स्नेहल पराडकर आदी व इतर उपस्थित होते प्रारंभी प्राचार्य बनसोडे यांनी स्वागत केले तर प्रा बांदेकर यांनी प्रास्ताविक केले
यावेळी डी.वाय.एस.पी. शेलार म्हणाले, “आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी काबाडकष्ट करतात. त्यांच्या कष्टांची आणि त्यागाची जाणीव प्रत्येक युवकाने ठेवली पाहिजे. शिक्षणाकडे गांभीर्याने पाहून आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित करा. व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात. युवकांनी व्यसनांच्या आहारी न जाता आपल्या भवितव्याचा विचार करावा. चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि वाईट सवयींपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे असे सांगून त्यांनी पालकांनी १८ वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हा कायदेशीर गुन्हा असून अशा प्रकारांमध्ये पोलिसांकडून नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल. प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहन चालविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.
श्री शेलार यांनी सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. “सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या व्यक्तींनी घाबरून न जाता तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी. युवकांनी स्वतः सायबर गुन्ह्यांबाबत माहिती घेऊन आपल्या पालकांना, नातेवाईकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याबाबत जागरूक करावे. अनोळखी लिंक, फोन, संदेश किंवा ऑनलाइन व्यवहारांबाबत काळजी घ्यावी,” असे डी.वाय.एस.पी. शेलार यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी ‘सायबर जागृती प्रतिज्ञा’ घेतली. शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. बनसोडे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
