Headlines

मालवणात काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांची प्रतिमा जाळत केला निषेध…

ज्ञानेश कुमारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी..

⚡मालवण ता.०८-:
निषेध असो निषेध असो… ज्ञानेश कुमार यांचा निषेध असो… लोकशाही गिळंकृत करणाऱ्या सरकारचा निषेध असो… अशा घोषणा देत मालवण शहरात राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात निषेध आंदोलन करत त्यांची प्रतिमा जाळण्यात आली. जनतेच्या मतांचा अनादर करत देशद्रोही ज्ञानेश कुमार यांनी नागरिकांची भावना दुखावली आहे. त्यामुळे त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केली.

निवडणूक आयोग आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ काँग्रेसकडून लोकशाही वाचवा सप्ताह राबविण्यात येत असून या अंतर्गत मालवणात आंदोलन करण्यात आले. या आंदोलन वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, सरचिटणीस देवानंद लुडबे, ओबीसी प्रदेश सचिव महेश अंधारी, सेवादल माजी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सरदार ताजर, महेंद्र मांजरेकर, पराग माणगावकर, तळवडेकर, बाबा मेंडीस व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते
उपस्थित होते.

दिल्ली येथे सुरु असलेल्या ज्ञानेश कुमार विरोधी आंदोलनात काँग्रेस नेते व विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी- वड्रा यांच्यावर झालेला लाठीचार्ज बद्दलही यावेळी काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर म्हणाले, ज्ञानेश कुमार यांनी प्रशासकीय सेवेत आपल्या पदाचा गैरवापर करत कसूर केला आहे. मतदार एसआयर प्रक्रियेत त्यांनी मतदारांचा घोळ केला. त्याचाच गैरफायदा घेत भाजप सत्तेवर आली आहे. यामुळे ज्ञानेश कुमार यांनी लोकशाही पायदळी तुडवली आहे, त्यामुळे त्यांना तात्काळ बडतर्फ करावे आणि देश विरोधी कृत्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही अरविंद मोंडकर म्हणाले.

You cannot copy content of this page