नदीप्रवाह सुरळीत करून नदीकाठाचे सुशोभीकरण व संरक्षणात्मक बांधकाम करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी..
⚡मालवण ता.०८-:
देऊळवाडा-आडवण ते रेवतळे मार्गावरील कोळंब नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला गाळ तातडीने उपसा करून नदीप्रवाह सुरळीत करावा. तसेच नदीकाठाचे सुशोभीकरण व आवश्यक ठिकाणी संरक्षणात्मक बांधकाम करावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मालवण उपशहरप्रमुख किरण चव्हाण व युवासेना उपशहरप्रमुख उमेश चव्हाण यांनी मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोळंब येथील नदीपात्रात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नदीचा नैसर्गिक प्रवाह मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. नदीपात्रात गोडे पाणी साचून राहिल्याने परिसरातील विहिरींना पूर्वी गोड्या पाण्याचे झरे मिळत होते. मात्र, नदीपात्रातील गाळ साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह व पाण्याची नैसर्गिक देवाणघेवाण बाधित होत असून आडारी खाडीच्या खाऱ्या पाण्याचा परिणाम विहिरींवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता नदीपात्रातील गाळ उपसा करणे अत्यंत आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. गाळ काढून नदीचा प्रवाह सुरळीत केल्यास नदीकाठच्या विहिरींमध्ये गोड्या पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवरही काही प्रमाणात उपाय होण्याची शक्यता आहे. सध्या पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असताना हा प्रश्न अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यामुळे कोळंब नदीपात्रातील गाळ उपशाचे काम संबंधित आराखड्यात तातडीने समाविष्ट करून आवश्यक निधीची तरतूद करावी आणि प्रत्यक्ष कामाला विलंब न करता सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

