Headlines

गोवा ट्रक असोसिएशनच्या मनमानीविरोधात चिरेखाण व्यावसायिकांचा एल्गार…

सावंतवाडीतील चिरे व्यवसाय ठप्प; न्याय न मिळाल्यास गोव्याकडे जाणारी वाहतूक रोखण्याचा संजू परब यांचा इशारा..

⚡सावंतवाडी : गोव्यातील ‘पेडणे-बार्देश गोवा ट्रक ओनर्स असोसिएशन’च्या अन्यायकारक धोरणामुळे सावंतवाडी तालुक्यातील पारंपारिक चिरेखाण उत्खनन व विक्री व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. यामुळे स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून यावर तोडगा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे व आमदार निलेश राणेंच लक्ष वेधणार असून व्यावसायिकांना न्याय मिळवून देणार असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला. तर या विषयावर सकारात्मक तोडगा निघेपर्यंत तालुक्यातील ४० ही चिरेखाणीतून एकही गाडी गोव्यात जाणार नसून गोव्यातील वाळू, चिरे वाहतूक करणाऱ्या गाड्या सिंधुदुर्गात आल्यास त्याही रोखल्या जातील, असा इशारा श्री. परब यांनी दिला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. परब म्हणाले, गोवा आणि सिंधुदुर्गचे संबंध चांगले राहिले असून ते अबाधित राहावेत हीच आमची इच्छा आहे. मात्र, गोव्यातील असोसिएशनच्या भूमिकेमुळे वाद निर्माण झालेत. चिरेखाण व्यावसायिकांना जीएसटी भरावा लागत असून डिझेलचेही दर वाढले आहेत. त्यामुळे त्यांनाही भाववाढ करावी लागली आहे. आज जिल्ह्यातील गाड्या गोव्यात घेतल्या जात नसून बंधने घालण्यात येत आहेत. हे अन्यायकारक असून याबाबत खासदार नारायण राणे यांच्याशी बोलून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्याची मागणी करणार आहोत. तर यावर सकारात्मक तोडगा निघेपर्यंत तालुक्यातील ४० चिरेखाणीतून एकही गाडी गोव्यात जाणार नसून जिल्ह्यात इतर ठिकाणी जाणाऱ्या गाड्या देखील बंद ठेवू असा इशारा श्री. परब यांनी दिला. तसेच याबाबत आमदार निलेश राणे यांच्याशी बोलणार असून चिरेखाण व्यावसायिकांची भेट त्यांच्याशी घालून देणार आहे. गोव्यासोबत आम्हाला वाईटपणा घेण्याचा मानस नसून चिरे, खडी, वाळू गोव्याला इथून पुरवली जाते. मात्र, भावच मिळणार नसेल तर ते शक्य होणार नाही असंही मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर जांभा दगड घरकुल बांधकामासाठी तसेच शेजारील गोवा राज्यात विक्रीसाठी पाठवला जातो. मात्र, मागील दोन वर्षांपासून गोव्यातील पेडणे-बार्देश ट्रक ओनर्स असोसिएशनकडून महाराष्ट्रातील वाहनधारक आणि चिरेखाण व्यावसायिकांची प्रचंड पिळवणूक सुरू आहे. सर्व मालवाहनधारकांना संघटनेचा लोगो लावण्याची सक्ती केली जात आहेत. गाड्या अडवून आर.टी.ओ., पोलीस आणि माईन्स डिपार्टमेंटमार्फत जाणीवपूर्वक कारवाई करण्यास भाग पाडले जात आहे. गोवा चेकपोस्टवर गाड्या अडवून त्या रिकाम्या करून घेणे आणि चालकांना धमकावणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. सध्या गोव्यातून येणाऱ्या आणि महाराष्ट्रातील सर्व गाड्या बंद पाडल्यामुळे येथील चिरेखाण व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.
एकीकडे गोव्यातील युनियनच्या जाचाला सामोरे जावे लागत असतानाच, दुसरीकडे शासकीय विभागांकडूनही चिरेखाण व्यवसायिकांची कोंडी केली जात असल्याचे समोर आले आहे. हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. त्यामुळे गोवा युनियनच्या मनमानी कारभाराला चाप लावावा आणि प्रशासकीय पातळीवरील जाचक अटी शिथिल करून न्याय द्यावा, अशी मागणी चिरेखाण व्यवसायिकांनी केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, चिरेखाण व्यावसायिक संघाचे प्रकाश राऊत, अमित प्रभू, मदन सातोसकर, सुशिल कामटेकर, रंजन गावडे, प्रदिप मुळीक, दिगंबर कवठणकर, प्रविण बर्वे, गिरीश परब, राजेंद्र नाईक, गंगाराम मठकर, गिरीश परब, रंजन गावडे, दिगंबर कवठणकर, अजित कवठणकर आदींसह तालुक्यातील चिरेखाण उपस्थित होते.

You cannot copy content of this page