वेंगुर्ला – सावंतवाडी पोलिसांची संयुक्त कारवाई ; आज न्यायालयात हजर करणार
सावंतवाडी / वेंगुर्ला
महाराष्ट्रामध्ये गोवंश जनावरांच्या कत्तलीस बंदी असतानाही गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सावंतवाडी येथील सराईत संशयिताला अखेर अटक करण्यात आली आहे. सरफराज भाऊद्दीन ख्वाजा (रा. बाहेरचा वाडा,ता. सावंतवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ला पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी संयुक्तपणे सापळा रचून ही कारवाई केली.
धाकोरे येथे २५ किलो गोमांस टाकून झाला होता फरार :
दि.१५ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संशयित सरफराज हा सावंतवाडी येथून दुचाकीवरून २५ किलो वजनाचे गोमांस विक्रीच्या उद्देशाने घेऊन आजगावच्या दिशेने जात होता. धाकोरे रस्त्यावरून जात असताना जागरूक ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला.यावेळी संबंधित संशयिताने स्वतःच्या ताब्यातील सुमारे २५ किलो गोमांस उदय कृष्णा मुळीक (रा. धाकोरे) यांच्या काजूच्या बागेत फेकून दिले आणि दुचाकीसह तेथून पलायन केले होते.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ वेंगुर्ला पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपिका मठकर या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या व या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात संबंधित संशयित विरोधात भारतीय न्याय संहिता (IPC) कलम ३२५, २७१ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ (c) आणि ९ (A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस पथक त्याचा ( जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर ) शोध घेत होते.वेंगुर्ला पोलिसांत गुन्हा दाखल असलेला सराईत संशयित सरफराज ख्वाजा हा शुक्रवारी दुपारनंतर सावंतवाडी येथील बाहेरचा वाडा भागात आपल्या घराजवळ आल्याची गोपनीय माहिती सावंतवाडी पोलिसांच्या बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक माधुरी मुळीक, प्रमोद पाटील, पोलीस हवालदार अमित राऊळ, मंगेश शिंगाडे, महेश निरवडेकर, पोलीस कॉन्स्टेबल पवन परब आणि श्रीमती नाईक यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपीच्या हालचालींवर शिताफीने निगराणी ठेवली.दरम्यान, वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड हे देखील आपल्या पथकासह सावंतवाडीत दाखल झाले. दोन्ही पोलीस पथकांनी मिळून रीतसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत संशयित सरफराज ख्वाजा याला ताब्यात घेतले. ही संपूर्ण कारवाई शुक्रवारी सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत अत्यंत गोपनीय आणि वेगाने करण्यात आली. संबंधित संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई वेंगुर्ला पोलीस करीत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोडा बीटचे ठाणे अंमलदार प्रसाद कदम हे करीत आहेत. संबंधित संशयितास शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वेंगुर्ला सावंतवाडी पोलिसांच्या या सूक्ष्म कारवाईचे जिल्ह्यातून विशेष कौतुक होत आहे. अवैध गुरे वाहतूक प्रकरणी दोन्ही पोलीस स्थानके जोरदार कारवाई करीत असून या कामगिरीबाबत विशेष कौतुक होत आहे.
