Headlines

दिव्यांग लाभार्थ्यांना युडीआयडी कार्ड बंधनकारक ; १५ जुलै पर्यंत मुदतवाढ…

⚡मालवण ता.२३-:
केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता वैश्विक ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच हे युडीआयडी कार्ड आधार कार्डसोबत लिंक करणेही अनिवार्य आहे. ज्या लाभार्थ्यांकडे अद्याप हे कार्ड नाही, त्यांना स्वावलंबन पोर्टलवर अर्ज करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी दिली आहे.

शासनाच्या परिपत्रकानुसार, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना हे कार्ड काढणे गरजेचे आहे:

दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या निर्णयानुसार, विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना १५ जून २०२६ पर्यंत स्वावलंबन पोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक होते. मात्र, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अवर सचिवांच्या पत्रानुसार आता या मुदतीत वाढ करण्यात आली असून लाभार्थ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

विशेष सहाय्य योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी ३० सप्टेंबर पूर्वी आपले वैश्विक ओळखपत्र काढून घेणे अत्यंत बंधनकारक आहे. जे लाभार्थी या विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांना पुढील महिन्यापासून मिळणाऱ्या शासकीय अनुदानापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ज्या लाभार्थ्यांकडे अद्याप युडीआयडी कार्ड नाही, त्यांनी https://swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन किंवा जवळच्या महा ई-सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे. त्यासाठी आधार कार्ड, शिधापत्रिका, दिव्यांगत्व दर्शविणारा फोटो, पूर्वीचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र, पूर्वी नोंदणी केली असल्यास त्याची पावती ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

विशेष सहाय्य योजनेतील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अद्याप वैश्विक ओळखपत्र नाही, त्यांनी त्वरित ऑनलाईन फॉर्म भरावा. फॉर्म भरल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे जाऊन आपली शारीरिक तपासणी करून घ्यावी आणि ऑनलाईन युडीआयडी कार्ड काढून घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार गणेश लव्हे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page