दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास चिखलाचे पाणी मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ओतण्याचा नगरसेवक देव्या सुर्याजी यांचा इशारा…
सावंतवाडी : पावसाच्या हलक्या सरीनंतरही मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबत आहे. या गटारांची कामे नव्याने व सर्वप्रथम करावी अशी मागणी करूनही त्या कामांना मंजुरी दिली गेली नाही. त्यामुळे संचयनी आरपीडी रोड परिसर, कंटक पाणंद, साईमंदीर तसेच चंदू भूवन येथील मुख्य रहदारीच्या ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचत आहे. मात्र, मुख्याधिकाऱ्यांकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. मिटींगची कारण देत फोन उचलत नाही, मेसेजही बघत नाहीत. यावर नगरपरिषदकडून तात्काळ कार्यवाही न झाल्यास हे चिखलाचे पाणी मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये आणून ओतणार, असा इशारा स्थानिक नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
श्री. सुर्याजी म्हणाले, नगरपरिषदेच्या पहिल्या स्थायी समिती सभेत गटांराचा मुद्दा मांडला होता. मुख्य बाजारपेठेत ही गटारे असून त्याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे आज पावसाच्या हलक्या सरी पडल्यानंतरही रस्त्यावर पाणी साचते. बाजारपेठ असल्याने शालेय विद्यार्थी, महिला, नागरिकांना या चिखलातून वाट काढावी लागते. येथून जाणाऱ्या वाहनांमुळे हे पाणी लोकांच्या अंगावर उडते. याबाबत लक्ष वेधूनही कार्यवाही झालेली नाही. संचयनी आरपीडी रोड, कंटक पाणंद, साई मंदीर पंचम देवस्थान, चंदू भुवन आदी ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून फोन केल्यावर मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले जाते. मेसेज देखील बघितले जात नाहीत. त्यामुळे आज लोकांना अंगावर चिखल उडवून घ्यावा लागतो आहे. दोन दिवसांत तात्पुरत्या स्वरूपात यावर कार्यवाही न झाल्यास हाच चिखल मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात नेऊन ओतणार, असा इशारा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
