गुरुदास गवंडे:संबंधित विभागाने तातडीने खड्डा बुजवून परिसर सुरक्षित करावा..
⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात असलेला मोठा खड्डा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात ये-जा करतात. मात्र, कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे अस मत सामाजिक कार्यकर्ते गुरूदास गवंडे यांनी व्यक्त केले आहे.
संबंधित खड्ड्यात केबल असल्यामुळे तो अजून धोकादायक आहे. महाविद्यालय सुरू झाली असून अनेक विद्यार्थ्यांसाठी लागणारे दाखले करण्यासाठी विद्यार्थी, पालक तहसीलदार कार्यालयात येतात. परंतु सर्वांना या खड्ड्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तहसीलदार सहित सर्व अधिकारी या खड्ड्यातून जातात. त्यावेळी त्यांना हा खड्डा दिसत नाही का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.जिल्हा प्रशासनाच्या महत्त्वाच्या कार्यालयासमोरच अशी परिस्थिती असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने खड्डा बुजवून परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी केली आहे.
