Headlines

शहरातील समस्या वाढत असताना”नगरसेवक कुठे गायब झाले…?”

आशिष सुभेदार:रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट आणि रखडलेल्या विकासकामांवर आशिष सुभेदार आक्रमक; समस्या न सुटल्यास घागर मोर्चाचा काढणार..

⚡सावंतवाडी ता.२३-:
सावंतवाडी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट आणि अन्य नागरी समस्यांवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी पालिका प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. पाच वर्षांनंतर जनतेने प्रत्येक प्रभागातून नगरसेवक निवडून दिले, मात्र सध्या शहरातील समस्या वाढत असताना हे लोकप्रतिनिधी नेमके कुठे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सावंतवाडी शहरातील अनेक भागात रस्त्यांची खोदाई झाल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत आहे, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर विविध विकासकामे रखडलेली आहेत. या समस्यांकडे प्रशासन आणि नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुभेदार यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.
“जनतेचा सेवक हा आपल्या प्रभागातील प्रत्येक समस्या ही स्वतःच्या घरातील समस्या समजून सोडवणारा असायला हवा. मात्र सध्या सावंतवाडीत नगरसेवक प्रभागात दिसत नाहीत,” अशी टीका त्यांनी केली.
खासकीलवाडा आणि न्यू खासकीलवाडा प्रभागातील रखडलेल्या विकासकामांबाबत आवाज उठवल्यानंतर पालिका प्रशासन जागे झाले असून कामांना सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रभागात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमधील अंतर्गत गटबाजीमुळे विकासकामांवर परिणाम झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठेकेदार आणि प्रशासनाच्या नियोजनाअभावी काही कामे अर्धवट राहिली असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असून पाणीटंचाईच्या काळात अशा घटना नागरिकांच्या हिताच्या नसल्याचे सुभेदार यांनी म्हटले आहे.
ज्युस्तीननगर कमानीसमोर चुकीच्या खोदाईमुळे पाईपलाईन फुटून पाणी वाया गेल्याची घटना घडली. प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
कचऱ्याची समस्या, झाडी तोडणे, स्ट्रीट लाईटची कामे, अर्धवट गटार बांधकाम आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली खोदाई यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले.
“प्रलंबित कामे तातडीने पूर्ण न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल. तसेच पाणी समस्येवर तोडगा न निघाल्यास नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढण्यात येईल,” असा इशारा आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
दरम्यान, या आरोपांवर पालिका प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page