ग्रामस्थांनी मानले “नाम फाऊंडेशन”, “टाटा मोटर्स” आणि प्रशासनाचे आभार आता येईल पूरस्थितीवर नियंत्रण..
⚡कुडाळ ता.३०-: तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील हातेरी नदीतील गाळ उपसा केल्याने पुरस्थितीवर नियंत्रण मिळणार आहे. याकामी नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स यांनी सहकार्य केले. गावच्या वतीने त्यांचे आणि प्रशासनाचे आभार मानण्यात आले.
वेताळबांबर्डे गावाला पावसाळ्यात हातेरी नदीला पूरस्थितीचा मोठा फटका बसतो. यामध्ये प्रामुख्याने मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या तेलीवाडी येथील राहती घरे आणि शेतीत पाणी घुसून मोठे नुकसान येथील रहिवाशांचे होते. तसेच नदीलगत असलेल्या जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणात होते. मागील अनेक वर्षे हा प्रश्न येथील रहिवाशांना भेडसावत आहे. याबाबत स्थानिकांनी हातेरी नदीतील गाळ उपसाबाबत प्रशासन दरबारी पाठपुरावा केला. त्यानुसार, “नाम फाऊंडेशन”, “टाटा मोटर्स” आणि प्रशासनाच्या पुढाकारातून मागील १५ दिवस या नदीतील गाळ उपसा करण्यात आला. या नदीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पूरस्थिती निर्माण होत होती. तसेच घरांना सुद्धा धोका निर्माण झाला होता. मात्र, आता पहिल्या टप्प्यातील गाळ उपसा पूर्ण झाला असून यामुळे या भागात काही प्रमाणात तरी पूरस्थिती निर्माण होणार नाही.
या अनुषंगाने आज वेताळ बांबर्डेवासीयांच्या वतीने गाळ उपसा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गाळ उपसा प्रक्रियेत सहकार्य करणारे विक्रम आणि विकास यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गावच्या सरपंच वेदिका दळवी, गुरुनाथ सामंत, आनंद भोगले, पोलीस पाटील दिपाली कुबल, दिनेश शिरवलकर, प्रदीप गावडे, दिलीप तिवरेकर, रामचंद्र उर्फ आर. डी. सावंत, अनिल नाटळकर, जयराम बांदेकर, महेश मेस्त्री, सचिन तिवरेकर, पप्रीतम तिवरेकर, राकेश तिवरेकर, संतोष मांजरेकर, दत्ताराम तिवरेकर, मोहन शिरवलकर, रूपेश तिवरेकर, देवेंद्र सावंत, सुप्रिया शिरसाट आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी दिलीप तिवरेकर, दिनेश शिरवलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हातेरी नदीतील गाळ उपसा कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच “नाम फाउंडेशन”, “टाटा मोटर्स” आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
