⚡बांदा ता.३०-: श्री संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर, इन्सुली येथे साक्षात्कार दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक १ मे रोजी हा सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार असून भाविकांसाठी समृद्ध आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.
या सोहळ्याची सुरुवात सकाळी ६ वाजता काकड आरतीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक, सकाळी ९.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.
सायंकाळी ५ वाजता सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी ७ ते ८.३० वाजता पालखी सोहळा पार पडणार आहे. रात्री ९.३० वाजता आजगांवकर दशावतार नाट्यमंडळ, आजगांव यांचा ‘तिरुपती बालाजी’ हा दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
या सोहळ्याच्या माध्यमातून “अंतरीचा ज्ञानदीवा मालवू नको रे, हरी भजनातून काळ घालवू नको रे” हा संदेश देण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी व नाट्यरसिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संत सोहिरोबानाथ सेवा समिती, इन्सुली तसेच उत्कर्ष युवक कला, क्रीडा व व्यायाम मंडळ, इन्सुली व नाथभक्त यांच्या वतीने करण्यात आले आहे.
इन्सुली येथे साक्षात्कार दिन सोहळ्याचे आयोजन…
