दुरुस्ती न झाल्यास आंदोलन: रियाज खान व विजय बांदेकर यांचा इशारा.
⚡बांदा ता.३०-: बांदा–सटमटवाडी तसेच वाफोली गावातून जाणाऱ्या कालव्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कावरच गदा येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कालव्यांच्या दोन्ही बाजूंना झाडी-झुडपांनी अक्षरशः अतिक्रमण केल्याने पाण्याचा प्रवाह अडथळित होत आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना मोठ्या भेगा पडल्या असून काही भाग पूर्णपणे कोसळल्याचे चित्र आहे. परिणामी पाणी गळती, अपुरा पुरवठा आणि शेतीच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिक व शेतकरी संतप्त झाले आहेत. “दरवर्षी पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कामाचा पत्ता नाही,” असा संताप व्यक्त होत आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर येणाऱ्या हंगामात शेती धोक्यात येणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर युवासेना तालुकाप्रमुख रियाज बशीर खान आणि बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय बांदेकर यांनी तिलारी पाटबंधारे विभाग, सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून कालव्यांची तात्काळ दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्याची जोरदार मागणी केली आहे. “सदर कामात आणखी विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रशासनाने आता कागदी आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी जोर धरत असून येत्या काही दिवसांत या प्रश्नावर ठोस निर्णय घेतला जातो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
