“जीवाची मुंबय” उपक्रमातून गरजू महिलांना मुंबई दर्शनाची संधी..

⚡बांदा ता.३०-: कोकणातील अनेक महिलांचे “मुंबई पाहण्याचे” स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. श्री दयानंद कुबल यांच्या संकल्पनेतून आनंद फाउंडेशन, मुंबई व कोकण संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा विभागातील गरजू महिलांसाठी “जीवाची मुंबय” ही विनामूल्य सहल आयोजित करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या महिलांना मुंबईतील विविध प्रमुख ठिकाणांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. यात देवदर्शनासोबतच गेटवे ऑफ इंडिया, बोट सफर, हाजी अली, मेट्रो प्रवास, समुद्रकिनारे, उद्याने तसेच फिल्म सिटीचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांना आयुष्यात पहिल्यांदाच मुंबई पाहण्याचा योग या माध्यमातून मिळणार आहे.
सहलीची सर्व व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार असून ही सहल पूर्णपणे विनामूल्य आहे. सहभागी महिलांसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, सुरक्षित प्रवास, मार्गदर्शकांची साथ तसेच स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे. आयुष्यभर लक्षात राहील असा आनंददायी अनुभव देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.
दरम्यान, या सहलीसाठी ३० ते ६० वयोगटातील गरजू महिलांना अर्ज करता येणार असून विधवा व एकाकी महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पहिल्या २० पात्र महिलांनाच या उपक्रमाचा लाभ मिळणार असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दयानंद कुबल व टीम कोकण एनजीओ (मो. ९०२२९४३१३५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page