नागरिकांनी लक्ष वेधून देखील नगरपरिषद कोणतीही दखल घेत नाही: नगरसेविका अँड निता सावंत कविटकर यांची नाराजी, त्वरित दखल घेण्याची केली मागणी..
⚡सावंतवाडी ता.२१-:
समाज मंदिर परिसरातील वार्ड क्रमांक १० येथे मागील चार दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पाणी येत नसल्याने दैनंदिन कामांवर परिणाम होत असताना, मिळणारे पाणीही गढूळ व जंतूयुक्त असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. परंतु अद्याप कुठलीही दखल नगरपरिषदेने घेतली नसल्याने शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका अॅड.नीता सावंत कविटकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्या म्हणाल्या, समाज मंदिराजवळ सुरू असलेल्या खोदकामादरम्यान मुख्य पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. विशेषतः पाण्याच्या टाकीला पाणी भरणारा मोठा पाईप लिकेज झाल्यामुळे संध्याकाळी सुमारे सात वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. परिणामी टाकी पूर्ण भरत नसून नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी अत्यंत कमी दाबाने येत आहे किंवा काही ठिकाणी अजिबातच पाणी येत नाही.
याबाबत नगरपालिकेला वारंवार कळवूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप अँड नीता सावंत कविटकर यांनी केला आहे. तसेच संबंधित कर्मचारी दुपारपर्यंतही कामावर हजर राहत नसल्यामुळे दुरुस्तीचे काम रखडले आहे, अशीही नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, शिंदे शिवसेना स्वीकृत नगरसेविका अॅड. निता सावंत कविटकर यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने पाईपलाईन दुरुस्त करून नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
स्थानिक नागरिकांनीही लवकरात लवकर या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
