एकाच ठेकेदाराला १४२ कामे ; २१ टेंडर रद्द:स्वीकृत नगरसेवक सत्यजित पारकर यांनी त्या ठेकेदाराची कुंडलीच काढली
⚡कणकवली ता.१३-:
नगरपंचायतीच्या विशेष सभेत प्रशासकीय काळात मंजूर करण्यात आलेली तब्बल २१ टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुमारे ८ कोटी रुपयांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक सत्यजित पारकर यांनी केला आहे. एकाच ठेकेदाराला ही सर्व कामे देण्यात आल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी घातले गेले असेही श्री. पारकर म्हणाले.
कणकवली येथील शिंदे शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. पारकर पुढे म्हणाले, मराठा मंडळ ते स्मशानभूमी दरम्यानच्या गटार बांधकामात नियमानुसार काळा दगड वापरणे अपेक्षित असताना जांभा दगड वापरून निकृष्ट काम करण्यात आले. तेली आळी येथील सार्वजनिक विहीरही वादाच्या केंद्रस्थानी आली असून ती माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या घरामागे बांधण्यात आली आहे. या विहिरीवर इलेक्ट्रिक पंप वापरणे बंधनकारक असतानाही सहा पंपांच्या माध्यमातून पाणीउपसा सुरू आहे. मात्र ज्या उद्देशाने विहीर बांधण्यात आली त्या प्रमाणे नागरिकांना त्याचा वापर करता येत नाही. विहिरीच्या चारही बाजूना कठडे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी जायला योग्य मार्ग देखील नाहीय.
टेंबवाडी येथील फुटपाथ तसेच पटकीदेवी मंदिर ते रेल्वे स्टेशन जुना रोड या मार्गावरील रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करण्यात आला. २०१८ ते २०२५ या कालावधीत एकाच ठेकेदाराला तब्बल १४२ कामे देण्यात आल्याचा गंभीर मुद्दाही यावेळी सत्यजित पारकर यांनी मांडला.
या सर्व प्रकारामुळे कणकवलीकरांच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचा आरोप करण्यात येत असून संबंधित प्रकरणाची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री तसेच राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती सत्यजित पारकर यांनी दिली आहे. नगरविकास मंत्रालयाकडून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, भ्रष्टाचाराची पोलखोल होऊ नये यासाठी काही माजी नगरसेवकांकडून सेटलमेंटचे प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. मात्र अशा कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही.
यापुढील काळात देखील भ्रष्टाचार झालेली कामे पुराव्यासह बाहेर काढली जातील असा इशाराही श्री. पारकर यांनी दिला.
