⚡बांदा ता.१२-: “नियमित योगाभ्यास हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नसून मन:शांती, एकाग्रता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि विविध योगासने यांच्या माध्यमातून आपण निरोगी जीवनशैली अंगीकारू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने किमान काही वेळ योगासाठी द्यावा,” असे आवाहन फिटनेस योग अकॅडमीचे योगशिक्षक शेखर बांदेकर यांनी सावंतवाडी येथे केले.
कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे फिटनेस योग अकॅडमी, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत एक दिवसीय फिटनेस योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री बांदेकर बोलत होते.
यावेळी फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस योग अकॅडमीचे कोषाध्यक्ष रवींद्र प्रभू देसाई, कक्षा प्रमुख रामनाथ सावंत, सह कक्षा प्रमुख महादेव सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
दिपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर श्री बांदेकर यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष योगाभ्यास करून घेतला. यामध्ये सूर्यनमस्कार, विविध योगासने, सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम यांचा समावेश होता. तसेच विद्यार्थ्यांकडून कठीण आसनांचाही सराव करून घेण्यात आला.
योगाभ्यासाबरोबरच हेल्दी फूडचे महत्त्वही विद्यार्थ्यांना यावेळी समजावून सांगण्यात आले. नियमित योगाभ्यास केल्यास आपण रोगमुक्त राहू शकतो, त्यामुळे प्रत्येकाने योग आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री घुरे यांनी केले.
फोटो:-
सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल येथे योगाभ्यास करताना विद्यार्थी.
सावंतवाडीत विद्यार्थ्यांसाठी विशेष योग शिबिर” संपन्न…
