वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत शहरात ‘प्लास्टिक बंदी’ धडक मोहिम…

२० किलो प्लास्टिक जप्त ;
५ हजार दंड वसूल..

⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत पर्यावरण रक्षणासाठी आणि शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी शहरात ‘प्लास्टिक बंदी मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीच्या विविध भागांत कडक तपासणी करून बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतः वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांच्या थेट देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली नियुक्त केलेल्या ४ विशेष पथकांनी शहराच्या विविध भागांत ही कडक तपासणी मोहीम राबविली. या पथकांनी सकाळी १० वाजेपासून शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा, किरकोळ विक्रेते आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी केली.
या मोहिमेदरम्यान सुमारे २० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व साहित्य जप्त करण्यात आले आणि एकूण १० जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ५ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. भविष्यात असा साठा आढळल्यास अधिक कडक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.तपासणीसोबतच प्रशासनाने जनजागृतीवरही विशेष भर दिला. मोहिमेदरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना प्लास्टिक बंदीच्या नियमांची माहिती दिली. प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. शहराला प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

You cannot copy content of this page