तरुणांच्या आत्महत्यांवर संवेदनशील वृत्तांकनाची गरज…

दयानंद कुबल यांचे आवाहन..

⚡बांदा ता.११-: सावंतवाडी तालुक्यात अलीकडच्या काळात तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले असून, या गंभीर परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्या बातम्यांना अनावश्यक प्रसिद्धी किंवा सनसनाटी स्वरूप देण्याऐवजी अत्यंत संवेदनशीलतेने हाताळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आत्महत्यांच्या बातम्यांचे वारंवार आणि ठळकपणे होणारे वृत्तांकन मानसिकदृष्ट्या खचलेल्या तरुणांच्या मनावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते, ज्यामुळे त्यांच्यात नैराश्य अधिक गडद होण्याची भीती कुबल यांनी व्यक्त केली आहे. माध्यमांनी केवळ बातमी म्हणून याकडे न पाहता समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन समुपदेशनाची भूमिका मांडणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मताचा दाखला देत कुबल यांनी स्पष्ट केले की, घटनांचे तपशीलवार आणि अतिरंजित वर्णन केल्यास अस्थिर मानसिकतेचे तरुण टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त होऊ शकतात. अशा वेळी माध्यमांनी संकटावर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या कथा समाजासमोर आणायला हव्यात. तसेच, नैराश्यात असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध असलेली मदत केंद्रे आणि समुपदेशन सुविधांची माहिती पोहोचवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. आजच्या काळात तरुणांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळवून देणे ही काळाची गरज बनली आहे. प्रसारमाध्यमांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून संतुलित वृत्तांकन केल्यास नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या तरुणांना नवी दिशा मिळण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास दयानंद कुबल यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.
फोटो:-
मुलांना समुपदेशन करताना दयानंद कुबल.

You cannot copy content of this page