Headlines

​ज्येष्ठ पत्रकार, माजी शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम वाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡सावंतवाडी,ता.२६-:
ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तसेच विविध वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी उत्तम उर्फ भास्कर सूर्यकांत वाडकर (७२)यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

​उत्तम वाडकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेतून केली. सामाजिक भान जपून त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना नेहमी वाचा फोडली. पत्रकारितेत सक्रिय असतानाच त्यांनी वृत्तपत्र संघटनेच्या विविध पदांवर राहून पत्रकारांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी नेहमी पुढाकार घेतला. तसेच साप्ताहिक प्रकाशित करून सामाजिक प्रश्न सरकार दरबारी मांडले.
​पत्रकारितेसोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा दांडगा संपर्क होता. एकेकाळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली होती. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून घेताना त्यांना स्वाभिमान वाटत असे.आपल्या कार्यकाळात त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवून संघटना बळकट करण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्यांना ‘बापू” म्हणूनही ओळखले जाते.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, जिल्हा पत्रकार सघ अशा विविध पत्रकार संघटनेत काम केले.
​मागील काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे . पत्नी, मुलगा कुलदीप, विवाहित मुलगी,जावई,नात तसेच वाडकर कुटुंब आहे.
उत्तम वाडकर यांच्या निधनाची माहिती मिळताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान कोल्हापूर हून रात्री सावंतवाडी येथील खासकीलवाडा निवासस्थानी आणले जाईल. त्यानंतर उद्या सोमवार दि.२७ जुलै रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येतील.
​दरम्यान उत्तम वाडकर यांचे लहान बंधू उदय वाडकर यांचेही निधन झाले.त्यांच्या वर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर उत्तम वाडकर यांच्या निधनाची वार्ता ऐकून सर्वांना धक्काच बसला. वाडकर कुटुंबातील दोन बंधूंच्या निधनानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

फोटो

You cannot copy content of this page