Headlines

आशुतोष (अमित) भांगले व प्रमोद कामत यांना यंदाचा ‘सेवाव्रती पुरस्कार’ जाहीर

बांदा :

समाजसेवा, शिक्षण, ग्रामीण विकास आणि विविध लोकोपयोगी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री आशुतोष (अमित) अरविंद भांगले आणि प्रमोद मधुकर कामत यांची रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे यंदाच्या ‘सेवाव्रती पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. दोन्ही मान्यवरांच्या कार्याचा गौरव होत असल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्री आशुतोष (अमित) भांगले यांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान दिले आहे. रक्तदान शिबिरे, आरोग्य जनजागृती, गरजूंना मदत, युवकांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन तसेच विविध सार्वजनिक आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सेवाभावी कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे.तसेच सिंधुदुर्गातील ई पत्रकारीतेची सुरवात ही त्यांनी केली आहे.

सध्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले प्रमोद कामत यांनी समाजकारण, शिक्षण, ग्रामीण विकास आणि जनसेवा या क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. ग्रामपंचायत सरपंच, शिक्षण व आरोग्य सभापती, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी तसेच सामाजिक उपक्रमांचे नेतृत्व करत त्यांनी विकासाभिमुख कार्याचा ठसा उमटविला आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातूनही त्यांनी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, रक्तदान, गरजूंना मदत आणि समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत.

समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ, सातत्यपूर्ण आणि लोकाभिमुख कार्याची दखल घेत या दोन्ही मान्यवरांची ‘सेवाव्रती पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली असून, लवकरच होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page