ग्रामस्थांची मागणी: एकच डॉक्टरवर ताण नको..
आंबोली,ता.११ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांनी राजीमामा दिल्याने ते रिक्त पद असून दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी गरज आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि शासनाने याठिकाणी तात्काळ वैद्यकीय अधिकारी पद नियुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात १ जानेवारी २०२६ पासून डॉ. प्रमोद गजानन गहाणे,गट ‘अ’ हे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.या ठिकाणी कार्यरत डॉ.महेश जाधव यांनी राजीनामा दिल्याने येथील पद रिक्त आहे.त्यामुळे याठिकाणी एकच वैद्यकीय अधिकाऱ्यावर ताण येत आहे.आंबोलीत दोन डॉक्टर कार्यरत होते. त्यामुळे याठिकाणी शासनाने तातडीने आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी. अशी ग्रामस्थांची मागणी आहे. येथील आरोग्य केंद्राचा व्याप पण मोठा आहे.शिवाय यांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अन्य सुविधा जवळपास नाही.३० किलोमीटर पर्यंत कोणती व्यवस्था शहर जवळ नाही. घाट परिसर तसेच पर्यटन केंद्र असल्यामुळे तसेच धुक्यात पण अनेक अपघात या ठिकाणी घडत असतात. त्याशिवाय येथील आरोग्य केंद्रातील ओपिडी जास्त आहे. या सर्वांचा भार एक डॉक्टर सांभाळू शकत नाही. त्यामुळे शासनाने याठिकाणी तात्काळ आणखी एक वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा. तसेच येथील आरोग्य केंद्रात चारही शिपाई पद रिक्त आहे. ती पदे देखील भरावीत. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
