मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती; सोनू निगम लाईव्ह कॉन्सर्ट ठरणार मुख्य आकर्षण..
कणकवली : नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस आज कणकवली येथे भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार असून यानिमित्त अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप व महायुतीतील घटक पक्षांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित आहे.
सायंकाळी ६ वाजता उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा सोहळा ‘न भूतो न भविष्यती’ ठरेल, असा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमाची घोषणा गुरुवारी कणकवली येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. त्यानुसार कार्यक्रमस्थळी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून प्रकाशयोजना, आसनव्यवस्था आदींची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे, जयकुमार गोरे, उदय सामंत, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे यांच्यासह राज्यभरातील अनेक मंत्री, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, खासदार नारायण राणे यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून प्रवेशद्वाराजवळ सेल्फी पॉईंटही उभारण्यात आले आहेत. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट ठरणार आहे. तसेच संजय दत्त यांची विशेष उपस्थिती असून ते रसिकांसमोर संवाद सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव व पोलीस निरीक्षक तेजस नलावडे उपस्थित होते.
