वैभव नाईक:पारंपारिक मच्छिमारांना न्याय न मिळाल्यास उबाठा शिवसेना आंदोलन छेडणार..
⚡मालवण ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार आणि मंत्री हे मच्छीमार विरोधी असून त्यांच्या आशीर्वादानेच समुद्रात बेकायदेशीर एलईडी आणि पर्ससीन मासेमारी फोफावली आहे. सत्ताधाऱ्यांचेच पदाधिकारी व कार्यकर्ते हे एलईडी धारक मच्छिमार असल्याने त्यांच्यावर कारवाई करणार कोण ? एकीकडे पालकमंत्री कारवाईचे नाटक करत असून दुसरीकडे
रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आमदार मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून संबंधित बोटधारकांना सोडायला सांगत आहेत, असा गंभीर प्रकार जिल्ह्यात सुरु असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत करत सत्ताधाऱ्यांनी पारंपारिक मच्छिमारांना वाऱ्यावर सोडले असून पारंपारिक मच्छिमारांना न्याय न मिळाल्यास उबाठा शिवसेनेकडून लवकरच आंदोलन छेडले जाईल असा इशाराही श्री. नाईक यांनी दिला.
मालवण येथील ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, महेश जावकर, सौ. दीपा शिंदे, पूजा करलकर, महेश देसाई, गणपत आडिवरेकर, स्वप्निल आचरेकर, बाळा तारी, बंड्या सरमळकर, नंदू गवंडी, रवी तळाशीलकर, प्रदीप मयेकर, चिंतामणी मयेकर, विजय नेमळेकर, गणेश चव्हाण, दत्ता पोईपकर, दीपा जावकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी वैभव नाईक म्हणाले, पालकमंत्री आणि मत्स्यविकास मंत्री एलईडी बंदीच्या केवळ वल्गना करत आहेत. प्रत्यक्षात केवळ १०-१२ बोटींवर कारवाई करून मत्स्य विभाग हात झटकत आहे. दिवसाढवळ्या किनाऱ्यालगत बेकायदेशीर बोटी वावरत असताना, “सत्ताधाऱ्यांचे फोन येतात म्हणून कारवाई करता येत नाही,” अशी कबुली मत्स्य विभागाचे अधिकारी खासगीत देत असल्याचा दावा यावेळी नाईक यांनी केला. मच्छीमारांना मिळणाऱ्या डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. बाजारात ९३ रुपये दराने मिळणारे डिझेल आता मच्छीमारांना महाग पडत आहे. डिझेल परतावा वेळेवर मिळत नसल्याने जिल्ह्यातील मच्छीमारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे किनारपट्टीचे संपूर्ण अर्थकारण धोक्यात आले आहे.
“अवैध मासेमारी रोखण्यासाठी स्पीड बोटी आणू,” असे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र या बोटी कुठे आहेत? असा सवाल नाईक यांनी केला.
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच या अवैध मासेमारीत गुंतले असून, त्यांच्याकडून दरमहा लाखो रुपयांची हप्तेखोरी सुरू असल्याचा गंभीर आरोप वैभव नाईक यांनी केला. एलईडी मासेमारीमुळे समुद्रातील मासळी ओरबाडून नेली जात आहे. परिणामी, पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात मासे मिळेनासे झाले आहेत. सरकार परदेशात होणाऱ्या मोठ्या निर्यातीचे आकडे फुगवून सांगत असले, तरी स्थानिक कष्टकरी मच्छीमार मात्र उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे. सत्ताधारी आमदारांनी मच्छीमारांना वाऱ्यावर सोडले असले तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. मी स्वतः तसेच परशुराम उपरकर आणि हरी खोबरेकर आम्ही सर्वजण मच्छीमारांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरू. १० वर्षांपूर्वी आम्ही जसा मच्छीमारांना न्याय दिला होता, तसाच न्याय पुन्हा मिळवून देण्यासाठी मत्स्य विभागाच्या विरोधात लवकरच तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला. मच्छीमारांनी आणि सामाजिक संस्थांनी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. सत्ताधाऱ्यांची हप्तेखोरी बंद पाडल्याशिवाय पारंपरिक मच्छीमार वाचणार नाही, असेही श्री. नाईक यांनी स्पष्ट केले.
