आरोग्य सभापतींच्या कार्यतत्परतेमुळे धोका दूर..
⚡मालवण ता.०२-:
मालवण शहरात आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील वायरी मुख्य रस्त्यावर रिंगीच्या झाडाची फळे पडून त्यावर वाहनांची ये- जा होऊन रस्त्यावर फेस निर्माण झाल्याने हा रस्ता धोकादायक बनला होता. याठिकाणी वाहने घसरून अपघात होत असल्याचे निदर्शनास येताच नगरपालिकेच्या आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी आरोग्य विभागाशी तात्काळ संपर्क करून स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत या रस्त्याची साफसफाई करून घेतल्याने रस्त्यावरील धोका दूर झाला.
मालवण शहरात आज सकाळी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रस्ते ओले झाले होते. त्यातच वायरी मुख्य रस्त्यावर रिंगीची झाडे असल्याने त्याची फळे रस्त्यावर पडली होती. रस्ता ओला असल्याने या फळांवरून वाहनांची ये – जा झाल्याने फळांमधून फेस बाहेर येऊन तो रस्त्यावरील पाण्यात मिसळल्याने पूर्ण रस्त्यावर फेस पसरला होता. या फेसामुळे रस्त्यावरून जाणारी वाहने घसरू लागली होती. यामुळे मोठ्या अपघाताचीही भीती निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून रस्ता साफ करून घेतला. यासाठी त्यांनी स्वतःची वाहने उपलब्ध करून दिली. रस्ता साफ होऊन वाहन चालवणे सुलभ बनल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
