*आमदार वैभव नाईक यांची माहिती; युद्ध पातळीवर काम सुरू
मालवण दि प्रतिनिधी तौक्ते वादळाच्या तडाख्यात वीज वितरण कंपनीचे प्रचंड नुकसान झाल्याने मालवण शहर व परिसरात गेले चार दिवस वीज पुरवठा खंडित असून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. कोसळलेले वीज पोल व वीज वाहिन्या जोडण्याच्या कामासाठी जिल्ह्याबाहेरून मनुष्यबळ मागविले असून कोल्हापूर येथील २५ जणांची टीम मालवणात दाखल झाली आहे. तर अजून ५० जणांची टीम दाखल होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत शहरातील काही भागातील वीज पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे. तौक्ते वादळाचा सर्वाधिक फटका मालवण व वेंगुर्ला तालुक्याला बसला असून मालवणात मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळल्याने ठिकठिकाणी वीज वाहिन्या तुटून वीज पोल जमीनदोस्त झाले. यामुळे गेले चार दिवस मालवण शहर व परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामासाठी प्रशासन व वीज वितरण विभागाकडून जिल्ह्याबाहेरून मनुष्यबळ मागविण्यात आले आहे. याबाबतची माहिती काल जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व आम. वैभव नाईक यांनी दिली होती. त्यानुसार आज मालवणात कोल्हापूर येथील २५ जणांची टीम दाखल झाली असून ठिकठिकाणी वीज वाहिन्या जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अजून ५० जणांची टीम दाखल होणार आहे. आज सायंकाळपर्यंत शहरात ५० टक्के भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या ज्या भागातील वीज वाहिन्या जोडण्यात येतील तसतसा टप्याटप्याने वीज पुरवठा सुरळीत होईल असे कोल्हापूर येथून मालवणात दाखल झालेल्या वीज कर्मचाऱ्यांनी सांगितले.
