बबन साळगांवकर यांचा इशारा
*💫सावंतवाडी दि.१९-:* देवेंद्र फडणवीस गो बॅक असे म्हणत, कोरोनाच्या संकटात देखील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात पाय ठेवू नये. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर येत असून, रत्नागिरी – रायगड भागाची ते पाहणी करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर साळगावकर यांनी त्यांना गो बॅक असे म्हटले आहे. त्यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक दिले असुन त्यात असे म्हटले की, देशामध्ये राष्ट्रीय आपत्ती असताना आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वागलात ती वर्तवणूक सत्ता पिसासू होती. राष्ट्रीय आपत्ती मध्ये संपूर्ण देशाने एकत्र येऊन काम करायला हवे होते. परंतु सत्ता गेल्यानंतर गेल्या दीड वर्षातील त्यांची वर्तणूक शाळेतील वर्गामधील एखाद्या नाटाळ विद्यार्थ्या सारखी राहिली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं थैमान सुरू असताना त्यांनी सरकार कोसळण्यासाठी केलेले प्रयत्न हे लांच्छनास्पद आहेत. ते वेळोवेळी सरकारची बदनामी करत होते. त्यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची बदनामी केली आहे. सत्तेचा माज कसा असतो हे त्यानी दाखवून दिलं जे चुकले असतील त्यांना शासन व्हायलाच हवं परंतु प्रत्येक विषय केंद्र सरकारच्या अखत्यारी नेऊन शासनाला अडचण करण्याचे प्रयत्न केला. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे या महाराष्ट्राने मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पाच वर्षे सहन केलं, महाराष्ट्र एकसंघ होऊन आपत्कालीन व्यवस्थापन केले असते तर कोरोनामुळे अनेक नागरिकांचे जीव वाचू शकले असते परंतु तुम्हाला संधी आली होती. पण केंद्रातील सत्तेचा नादात थयथयाट करून रुग्ण वाढण्यासाठी आपण व आपल्या सहकार्यानी केलेले प्रयत्न महाराष्ट्राने बघितली आहेत. ट्रेन सुरु करा, मंदिरे उघडा,परीक्षा घ्या, बस सुरू करा, जिम, शाळा, कॉलेज सुरू करा म्हणून आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. हे भोग आज महाराष्ट्र जनतेला भोगावे लागत आहेत. प्रत्येक गोष्ट उघडायला लावली त्यांची जबाबदारी तुम्ही घ्यायला तयार आहात का ? असा प्रश्न देखील साळगावकर यांनी उपस्थित केला आहे. जखम ही तुम्हीच करायची आणि मलमपट्टी पण आपणच लावतो हा बहाना करायचा. हे न समजण्या इतपत महाराष्ट्राची जनता मुर्ख नाही याची दखल तुम्ही घ्या. करोना काळात मला राजकारण करायचं नाही. पण देवेंद्र फडणवीस तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्रात बेजबाबदार पणे वागत आहात आणि कोकणात येत आहात म्हणून याची दखल घेणं क्रमप्राप्त आहे. देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवले असते परंतु सध्याची स्थिती वाढता कोरोना, शासनाने घातलेली बंधन यामुळे आम्ही गो बॅक देवेंद्र असे म्हणत त्यांनी निषेध नोंदवला आहे.
