Headlines

महायुतीचा विजय इतिहास घडवेल…

काका कुडाळकर: विनायक राऊत वैभव नाईक यांनी या मतदार संघाला विकासा पासून वंचित ठेवले..

⚡कुडाळ ता.०५-: महाविकास आघाडीकडे विकासाचे व्हिजन नाही, त्यांच्याकडे सक्षम नेता नाही असा टोला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी महाविकास आघाडीला लगावला. आमच्या महायुतीचे नेते खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी केलेली विकासकामे व मजबूत संघटन यामुळे कुडाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा वर महायुतीचा विजय हा निश्चित असून हा विजय इतिहास घडविणारा असेल असा विश्वासही व्यक्त केला.

कुडाळ येथील महायुतीच्या कार्यालयात काका कुडाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे सेनेचे कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, अरविंद करलकर, माजी जि. प. सदस्य संजय भोगटे, नगरसेवक राजीव कुडाळकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुडाळकर यांनी सांगितले की, दि. 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून आता केवळ 48 तास शिल्लक राहिले आहेत. आमदार राणे व पक्षाचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी हा कुडाळ मालवण मतदार संघ पिंजून काढला आहे, विकास कामांच्या जोरावर जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सर्व जागा महायुती जिंकणार हा ठाम विश्वास आहे.

  गेली 10 वर्ष तत्कालीन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी या मतदार संघाला विकासा पासून वंचित ठेवले होते,  त्यानंतर खासदार नारायण राणे व आमदार निलेश राणे यांना बहुमत मिळाले. आणि एका वर्षात विकासाची गंगा या मतदार संघात वाहिली आहे. 
  आता या निवडणुकीत विरोधकांकडे कोणतेच आव्हान नाही आहे, माजी आमदार वैभव नाईक आरोप करतात की, सिंधुरत्न बंद झाली आहे. अशा प्रकाराचे वक्तव्य माजी आमदार यांनी करणे योग्य नाही,  या योजनेस तीन वर्षे पूर्ण झाली असून पुणे येथील यशोदा संस्था ऑडीट करीत असून ऑडीट पुर्ण झाल्यावर जास्त निधी घेवून ही योजना परत येणार आहे.  
  विकास कामांच्या बाबतीत लोकांची दिशाभूल करणारे नाईक यांच्या नाकर्तेपणा मुळे त्यांचा आमदार फंडातील 1 कोटी निधी विकास कामांवर खर्च न करता शिल्लक राहिला, 10 वर्ष हा कुडाळ तालुका विकासा पासून वंचित राहिला होता.
    तर आमदार निलेश राणे यांनी पाहिल्याच वर्षी आमदार फंडातून व  जिल्हा नियोजन मधून सुमारे 1200 रुपयांचा निधी विकास कामांवर खर्च केला. तर नाईक यांनी तक्रारी करण्याचे काम केले. नेहमीच तक्रारी करण्याची नाईक यांना सवय आहे,  त्यातून त्यांचा यांचा नाकर्तेपणा दिसून येतो,  जी. प. नेरुर मतदार संघात तर त्यांना अपक्ष उमेदवार घेवून फिरायची वेळ आली आहे. नाईक यांनी जाहीर करावे की अपक्ष उमेदवार रुपेश पावसकर हे ठाकरे सेनेचे उमेदवार आहेत म्हणुन असे आवाहन ही कुडाळकर यांनी नाईक यांना दिले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्या अगोदर नाईक यांनी हे लक्षात घ्यावे की, जिल्हा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विकासाची लक्ष्मी आणली. शिंदे आमदार राणे यांच्या कामावर खुश आहेत. तौक्ते वादळात एकनाथ शिंदे यांनी मदत दिली तीच मदत नाईक वाटत होते. 

  लोकांच्या मागणी पेक्षा जास्त कोट्यावधी निधी आमदार राणे यांनी खर्च केला असून अजून ही प्रस्तावित अनेक विकास कामे लवकरच सुरू होणार आहेत. महायुती च्या नेत्यांची कार्यतत्परता काय असते हे 10 तारीख ला होणार्‍या जिल्हा नियोजन बैठकीत 500 कोटी चा आराखडा तयार होईल त्यावेळी दिसेल असे ही त्यांनी सांगितले.
You cannot copy content of this page