एकूण ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात..
कुडाळ : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडणार असून, निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी २२ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १८ जागांसाठी ४५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. अशा प्रकारे एकूण ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तालुक्यातील एकूण १,१६,६३० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, यामध्ये ५८,०९९ महिला आणि ५८,५३१ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
मतदान प्रक्रियेसाठी एकूण ८५० निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये: २४ क्षेत्रीय अधिकारी, १५३ केंद्राध्यक्ष, ४६० मतदान अधिकारी
प्रत्येक केंद्रावर शिपाई व व्यवस्थापकांची नेमणूक करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने ३५० पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले असून दोन जलद कृती पथकेही तयार ठेवण्यात आली आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यांत निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
निवडणुकीत मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी काही विशेष मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे:
सखी मतदान केंद्र: पावशी ढवणवाडी (केंद्र क्र. २८/१५)
आदर्श मतदान केंद्र: पिंगुळी (केंद्र क्र. ३१/०७)
सेल्फी मतदान केंद्र: माणगाव (केंद्र क्र. ३३/०५)
वाहतूक व्यवस्था
निवडणूक पथकांच्या येण्या-जाण्यासाठी आणि साहित्याच्या वाहतुकीसाठी महामंडळाच्या २३ बसेस आणि २८ जिप व इतर वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे.
