संदीप गावडे:तळवडे मतदारसंघात भव्य बाईक रॅली काढून केले जोरदार शक्तिप्रदर्शन..
⚡सावंतवाडी ता.०५-
विरोधकांकडे विकासाचे कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने ते फक्त फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत. मात्र जनता अशा अफवांना बळी न पडता विकासालाच साथ देईल आणि मला मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देईल, असा विश्वास तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी व्यक्त केला.
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या वतीने भव्य बाईक रॅली काढण्यात येत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना गावडे म्हणाले की, जनतेचा कौल विकासाच्या बाजूने असून आमचा विजय निश्चित आहे. तसेच पंचायत समिती सभापती पदावरही शिवसेनेच्या सुस्मिता जाधव विराजमान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बाईक रॅलीदरम्यान जिल्हा परिषद उमेदवार संदीप गावडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत उत्साह वाढवला. हा पंचायत समिती मतदारसंघ सभापती ठरवणारा असून महायुतीचाच सभापती होईल, असेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी माजी सभापती पंकज पेडणेकर, शिवसेनेचे सूरज परब, जालिंदर परब यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
