तिरोडा येथे बीएसएनएल 4G टॉवर अद्याप सुरू न झाल्याने सरपंच, उपसरपंच आक्रमक…

26 जानेवारी पूर्वी सुरू करा: अन्यथा उपोषण; बीएसएनएल अधिकाऱ्यांना निवेदनद्वारे दिला इशारा..

⚡सावंतवाडी ता.०८-:
तिरोडा गावात मंजूर झालेला बीएसएनएल 4G मोबाईल टॉवर तब्बल पाच ते सहा महिने उलटूनही अद्याप कार्यान्वित करण्यात आलेला नाही. यामुळे ग्रामस्थांना तीव्र गैरसोय सहन करावी लागत असून, याबाबत ग्रामपंचायत तिरोडा यांनी आज बीएसएनएल प्रशासनाला पुन्हा एकदा पत्राद्वारे जाब विचारला आहे. दरम्यान या संदर्भात त्वरित कार्यवाही न केल्यास 26 जानेवारी रोजी सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयासमोर संपूर्ण गावासह उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा तिरोडा सरपंच प्रियांका सावंत ग्रामपंचायतीच्या वतीने दिला आहे. याची गंभीर दखल घेऊन तात्काळ टॉवर सुरू करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत तिरोडा यांच्यावतीने करण्यात आली आहे.

ते म्हणाले, ग्रामपंचायतीने यापूर्वी 11 मार्च 2024, 19 डिसेंबर 2024 व 16 ऑक्टोबर 2025 रोजी बीएसएनएल प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केला होता. मात्र, टॉवरचे काम पूर्ण होऊनही नेटवर्क सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत बीएसएनएल कार्यालयात 3 ते 4 वेळा बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी टॉवर दिवाळीपूर्वी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप नेटवर्क सेवा सुरू झालेली नाही.

पूर्वी तिरोडा गावात नेटवर्क उपलब्ध असल्याने नागरिकांना सहज कॉल करता येत होते. सध्या मात्र मोबाईल नेटवर्क पूर्णपणे बंद असल्याने दैनंदिन व्यवहार, शासकीय कामकाज तसेच आपत्कालीन सेवांवर परिणाम होत आहे. त्यामुळे 26 जानेवारी पूर्वी याची दखल घेऊन त्वरित सुरू करावा, अन्यथा उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी उपसरपंच संदेश केरकर ग्रामपंचायत सदस्य भास्कर गोडकर विश्रांती साळगावकर गावडे मॅडम उपस्थित होते.

You cannot copy content of this page